घरफाळा घोटाळा : दोषी असतील त्यांचेवर कारवाई होणार.


कोल्हापूर मनपाच्या घरफाळा घोटाळ्यातील व्याप्ती वाढतच चालली.

आणखीन चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस.

PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :

कोल्हापूर : महापालिकेच्या घरफाळा घोटाळ्यातील व्याप्ती वाढतच चालली आहे. महापालिकेतील आणखी चार अधिकाऱ्यांना गुरूवारी उपायुक्त निखिल मोरे यांनी आर्थिक नुकसानीस जबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले, दिलीप कोळी, नंदन कांबळे आणि दीपक सोळंकी यांचा समावेश आहे.

चारही अधिकाऱ्यांनी चार दिवसांत म्हणजे 28 सप्टेंबरपर्यंत खुलासे करावेत; अन्यथा कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. चौदापैकी एकाच प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या आधारे या नोटिसा दिल्या आहेत. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका इमारतीची घरफाळा आकारणी करताना दर तीन वर्षांनी पंधरा टक्के करवाढ करणे बंधनकारक असताना ही करवाढ केली नसल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवला आहे.ही वाढ झाली नसल्याने कराची आकारणी कमी झाली आणि महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. त्यास जबाबदार धरून या नोटीस काढण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी दूरध्वनीवरून दिली.

महापालिकेच्या घरफाळा विभागातील घोटाळ्याचे प्रकरण गेल्या नऊ महिन्यांपासून गाजत आहे. कोल्हापुरातील सामाजिक संघटना, तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काही मालमत्तांच्या घरफाळा आकारणीबाबतच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची छाननी केल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्यासह चौघांवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत नगरसेवक भूपाल शेटे यांनी विविध आरोप केले आहेत. विशेषतः करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले हे देखील यामध्ये दोषी असल्याचा आरोप शेटे यांनी वारंवार केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने चौदा प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशी समितीच्या अहवालानुसार ही कारवाई झाली. मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका इमारतीत तीन विविध संस्थांना भाडेतत्त्वावर जागा दिली आहे. भाडेकरार आणि प्रत्यक्ष करआकारणी करताना दर तीन वर्षांनी 15 टक्के वाढ करणे बंधनकारक असताना ही वाढ केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई यामध्ये का करू नये? असे म्हटले आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानेही भोसलेंना नोटीस

विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी घरफाळा विभागात घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करून थेट आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणापैकी एका मालमत्तेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले यांच्याकडे मागितली होती; पण ही माहिती देण्यास पंधरा दिवस टाळाटाळ केल्याने या प्रकरणातही संजय भोसलेना कारवाई का करू नये, अशी नोटीस दिल्याचेही सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी सांगितले.

घरफाळा विभागाच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे. प्रशासन त्याची सखोल चौकशी करत आहे. जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होणारच.

- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका

Post a Comment

Previous Post Next Post