सरकार संख्यात्मक मजबूत पण गुणात्मक रामभरोसे..


सरकार संख्यात्मक मजबूत पण गुणात्मक रामभरोसे.

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 (  ९८ ५०८ ३० २९० )

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहितील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी ३१ऑगस्टला जाहीर केली. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर घसरलेली आहे. तब्बल २३.९ म्हणजे चोवीस टक्क्यानी अर्थव्यवस्था घसरणे हे अतिशय भयावह बाब आहे. कोरोनाचे संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉक डाऊन ही कारणे या घसरणीमागे आहेतच.मात्र त्याच वेळी गेली सलग सहा वर्षे अर्थव्यवस्था चुकीच्या आर्थिक धोरणाने घसरतच आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अत्यंत बेफिकीरीने व बेजबाबदारीने नोटाबंदी जाहीर केली.त्यात चुकीचे जीएसटी धोरण यांनी अर्थव्यवस्थेची परिणामी सामान्य माणसांची मोठी हानी केली.ही अवनती कोरोनवर थोपवायचे कारण नाही.कारण ही घसरण या सरकारच्या काळात प्रत्येक तिमाहिला सुरूच आहे.शिवाय इथल्या लॉक डाऊनचा निर्णयही वेळीच घेतला न गेल्याने आणि जेंव्हा घेतला तेंव्हा तो चुकीच्या पद्धतीने घेतला गेल्याने अर्थव्यवस्था घसरलीच शिवाय कोरोनाच्या रुग्णांची व मृतांची संख्याही वाढली हे नाकबूल करता येणार नाही. या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था ३.२ ने वाढली.तर आमची अर्थव्यवस्था चोवीस टक्क्यांनी घसरली.ही घसरण जपान,अमेरीकेच्या तिप्पट तर जर्मनी, कॅनडा, इटली,फ्रांस यांच्या दुप्पट आहे. हे थोपवता आले नाही म्हणूनच ही ' देवाची करणी ' असं अर्थमंत्री म्हणाल्या.मा.पंतप्रधान तर घरसलेल्या अर्थव्यवस्थेपेक्षा आणि ढासळलेल्या इतर सर्व परिस्थिती पेक्षा मोर, कुत्रा, खेळणी आदीचीच चर्चा करत आहेत.एक बाकी खरंय की,भारताला गेल्या सत्तर वर्षात असे नेतृत्व लाभले नव्हते.सरकार संख्यात्मकदृष्टया मजबूत आहेच.पण गुणात्मकदृष्टया ' रामभरोसे ' आहे यात शंका नाही. कारण सरकारच्या धोरणात च राम राहिलेला नाही.सगळी असंघटित क्षेत्रे कंगाल होत आहेत आणि अदानी - अंबानी सारखे सरकारी कृपावंत अधिकाधिक धनवंत होत आहेत.मुळात जबाबदारीच भान नाही आणि त्यात बेजबाबदारीच प्रमाण वाढतंय.या साऱ्याचा परिणाम देशात लाखो उद्योग धंदे बंद पडणे,करोडो रोजगार कमी होणे,महागाईचा दर वाढणे,रिझर्व्ह बँकेचा राखीव निधी संपविणे,पेट्रोल - डिझेलच्या अक्षम्य दरवाढीतून जनतेलाच लुबाडणे,केवळ आणि केवळ भावनिक,खुनशी,पाडपाडीचे राजकारण करणे ,सामान्यांचे जगणे महाग व मरण स्वस्त होणे  अशा अनेक बाबतीत झाला आहे. सर्व पातळ्यांवर अपयशी ठरवून ठरूनसुद्धा हे किती उत्तुंग यश आहे हे सांगणारे भाडोत्री व अंधभक्त समाजमाध्यमांवर ऍक्टिव्ह आहेतच.फेसबुकपासून सारी माध्यमे यात सामील करून घेतली गेली आहेत.अशावेळी मुद्यांवर आधारित विरोध तर केला पाहिजेच.कारण हा प्रश्न केवळ वर्तमानाचा नाही तर येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्याचा आहे.उगवत्या पिढीचे भवितव्य अंधकारमय करण्याचा अधिकार कोणालाही नसतो.याचे भान सत्ताधाऱ्यांनी आणि जनतेनेही ठेवले पाहिजे

Post a Comment

Previous Post Next Post