जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी


 जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 100 खाटांचे अद्ययावत कोविड केयर केंद्र सुरू करावे.

PRESS MEDIA LIVE : 

शिराळा-  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्या कारखाना कार्यस्थळावर 100 खाटांचे अद्ययावत ऑक्सिजनेटेड कोविड काळजी केंद्र त्वरीत सुरू करावे. त्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय मदत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाकडून 100 खाटांचे अद्ययावत ऑक्सिजनेटेड कोविड काळजी केंद्र सुरू करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना साखराळे, उदगिरी पॉवर अँड शुगर लि. बामणी, मोहनराव शिंदे सहकार साखर कारखाना आरग, निनाईदेवी-दालमिया स.सा. कारखाना लि. करूंगली, केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. रायगाव, सोनहिरा स.सा. कारखाना वांगी, क्रांती स.सा. कारखाना कुंडल, हुतात्मा स.सा. कारखाना वाळवे, विश्वास स.सा. कारखाना चिखली, दत्त इंडिया प्रा. लि. सांगली, वसंतदादा स.सा. कारखाना सांगली यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संकटाच्या या काळात समाजातील सर्वच घटकांनी कोरोना बाधितांच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या कारखाना कार्यस्थळावर 100 खाटांचे अद्ययावत कोविड काळजी केंद्र सुरू करावे. तसेच या केंद्रांचे संपूर्ण व्यवस्थापन संबंधित कारखान्यांकडूनच केले जावे. प्रशासकीयदृष्ट्या त्यांना आवश्यक असणारी मदत जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल.

Post a comment

0 Comments