कागदी घोडे नाचवणारे प्रशासन करते काय..?पालकमंत्री , सत्ताधारी , विरोधक,आणि  कागदी घोडे नाचवणारे प्रशासन करते काय.  ?

PRESS MEDIA LIVE :  सांगली :

सांगली : सांगली-मिरजेचा वैद्यकीय पंढरी, मेडिकल हब असा देशात लौकिक. जिल्ह्यात तीन मेडिकल कॉलेज, साडेतीनशे हॉस्पिटल्स, साडेआठशे एमबीबीएस डॉक्‍टर्स, अशी प्रचंड क्षमता असूनही आज घडीला देशात सर्वाधिक चार टक्के इतका कोरोना मृत्युदर अशी आजची जिल्ह्याची हतबल स्थिती. जीव वाचविण्याची संधीच नाकारणाऱ्या या हतबल व्यवस्थेचे करायचे काय? आता रोजचा आकडा पाचशेंवर पोहचला आहे. उपचाराविना, बेडविना रुग्ण मरत आहेत. महिन्यात आठ हजार रुग्ण. मग इथले पालकमंत्री, मंत्री आणि सत्ताधारी-विरोधक आणि कागदी घोडे नाचवणारे प्रशासन करतेय काय?

सांगली जिल्ह्यातील डॉक्‍टरांची परिस्थिती तर दयनीय आहेच, काही डॉक्‍टर याला अपवाद आहेत ते आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या नर्सेस, सहाय्यक यांच्यामुळे रुग्णांना मोठा आधारदेखील मिळाला आहे; पण अनेक डॉक्‍टर गायब आहेत, असा लोकांचा अनुभव ते माध्यमांना सांगत आहेत आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा बिनकामाची जिल्हा शल्य चिकित्सक सांगतात, ''आमची कपॅसिटी संपलीय...आम्हाला मारा, काळे फासा; पण आता या पलीकडे आमच्याकडून काही होणार नाही....''

संबंधित अधिकाऱ्यांनी आपली व्यथा मांडली, मात्र त्यांची जागा चुकली. ती त्यांनी लोकप्रतिनिधींच्या आढावा मीटिंगमध्ये मांडायला हवी. त्यामुळे सुस्थावलेली यंत्रणा कदाचित हलली असती. चार आमदार आणि पन्नास एक राजकीय पदाधिकाऱ्यांना कोरोनाने घेरले आहे. त्यांना तरी नक्कीच या परिस्थितीचे भान आले असते. पूर्वी भाजप सत्तेत पालकमंत्री जिल्ह्याबाहेरचा असल्याची टीका व्हायची. आता तीन पक्ष्यांच्या आघाडीतील वजनदार अनुभवी अशा जयंतरावांकडे हे पद आणि तरीही जिल्ह्याची ही अवस्था. उपचाराअभावी जीव जातायेत. मग पालकमंत्री आता प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणखी कशाची वाट पाहत आहेत? पतंगराव म्हणायचे प्रशासन अजगरासारखे सुस्त असते, त्याला सारखे टोचावे लागते. ते आज कळतेय. जिल्हा आणि पालिका प्रशासनाच्या मर्यादा उघड्या पडल्या आहेत. महापालिकेत भाजपचीच सत्ता, मात्र कारभारी आयुक्‍तच झाले आहेत.

महापालिकेच्या कोविड रुग्णालयाला रुग्णालय का म्हणावे? ९० च्या खाली ऑक्‍सिजन गेलेले रुग्णच तिथे घेणार नसतील तर मग ही काय खानावळ आहे का? कोट्यवधींचा हा सेट लावलाय का? तर जयंतरावांनी स्वातंत्र्यदिनी चारशे बेडच्या हॉस्पिटलची घोषणा केली. त्याला आता कोणता मुहूर्त हवा? दुर्दैव हे की या परिस्थितीवर सत्ताधारी आणि विरोधक सारेच मौनात. खासदारांनी फक्त इशारेच दिले. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर देवेंद्रजी सांगलीत येत आहेत. आता यंत्रणा थोडी अधिक हलेल. येथे डॉक्‍टर मिळत नाहीत, ही ओरड आहेच. मात्र, यंत्रणा हलवणे हे अधिक मोठे आव्हान आहे. मुंबईप्रमाणे इथेही केरळमधून वैद्यकीय स्टाफ मागवण्याच्या पर्यायाचा विचार करावा. सुरवातीच्या टप्प्यात विशेष अधिकारी म्हणून मुंबईहून पल्लवी सापळे यांना पाचारण केले होते. त्याप्रमाणेच आत्ताही असा निर्णय गरजेचा वाटतो. साधे बेड मिळविण्यासाठी रुग्णाच्या घरच्यांना नगरसेवकांपासून सामाजिक कार्यकर्ते ते पत्रकारांपर्यंत विनवण्या कराव्या लागतात. अशी वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. हॉस्पिटलच्या दारातच रुग्णाचा जीव जातोय. हे गंभीर आहे आणि गंभीरपणे घेतलं पाहिजे. कालच एका वाहन कंपनीचा चाळीस वर्षाचा मॅनेजर हृदयरोग रुग्णालयात बेड न मिळाल्याने जनरल रुग्णालयात हकनाक गेला. त्यांचे नातेवाईक रुग्णालयाचे दरवाजे ठोठावत होते. मात्र, तज्ज्ञ डॉक्‍टरच उपलब्ध झाले नाहीत. बेड नाहीत म्हणून अडीचशे किलोमीटरवर पुण्याला रुग्ण पाठवावे लागत आहेत.

ज्यांची ऐपतच नाहीत ते टाचा घासून मरत आहेत. इथल्या एका बड्या व्यापाऱ्याचाही पुण्याला नेण्याआधी वाटेत मृत्यू झाला. चार दिवसापूर्वी एक जत्रेत खेळणी विकून आपली उपजिविका करणारा तरूण डिपॉझिटसाठी पैसे नाहीत म्हणून विश्रामबागच्या रुग्णालयाच्या दारातच तडफडत गेला. मृत्यू स्वस्त झाला आहे. अशी किती उदाहरणे सांगावीत. खूप खोलवर जखमा झाल्या आहेत. त्या जखमा घेऊन शेकडो कुटुंबे जगणार आहेत. हॉस्पिटलच्या बिलांच्या झटक्‍याने लोक मरत आहेत. जनआरोग्य योजनेचा तर खेळखंडोबाच झालाय. प्रत्येक रुग्णाला सरसकट मोफत उपचार का मिळू नयेत. देशातील सर्वात श्रीमंत राज्याची ही स्थिती लाजीरवाणी नाही का? तक्रारीचे गाऱ्हाणे खूप आहे. मात्र आता प्रशासनाने धाडसी निर्णय घ्यायला हवेत. राज्य सरकार तर सांगलीत काय चाललंय याबाबत पूर्ण अनभिज्ञ असावे? विरोधी पक्षनेत्यांनी आता सरकारच्या कानी हे गाऱ्हाणे पोहचवावे. उपचाराअभावी जीव गेला ही वेळ तरी यापुढे नको. अनुभव येतो आहे.

Post a comment

0 Comments