पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या .

 

पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीच्या 788 कोटी रुपयांच्या अंदाज  पत्रकास मंजूरी

PRESS MEDIA LIVE : 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या 788 कोटी 53 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या सभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी स्कूल हेल्थ मॉनिटरिंग या प्रकल्पाच्या विस्तृत सिस्टीम डिझाईन अहवालास देखील मंजुरी दिली आहे.

स्मार्ट सिटी कंपनी संचालक मंडळाची दहावी सभा चिंचवड येथील ऍटोक्‍लस्टरमधील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात झाली. संबंधित सभेत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी स्कूल हेल्थ मॉनिटरिंग हा प्रकल्प राबविला जाणार आहे. संबंधित प्रकल्पाच्या विस्तृत सिस्टीम डिझाईन अहवालास आणि प्रकल्पाच्या निविदा काढण्यास मान्यता देण्यात आली.

सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबतच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला देखील चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. संबंधित प्रकल्पाची “पीपीपी’ तत्त्वावर अंमलबजावणी करण्याच्या विषयाला चर्चा करून मान्यता दिली. त्याशिवाय, स्मार्ट सिटी कंपनीसाठी तयार केलेल्या एसपीव्ही व्यवसाय अहवालाबाबत देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. पुढील सभेत आढावा घेऊन अंतिम आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कंपनीचे अध्यक्ष नितीन करीर, संचालक ममता बत्रा, विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित बैठकीत सहभागी झाले. महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते नाना काटे, पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, आयुक्त तथा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक तथा कंपनीचे संचालक प्रमोद कुटे, मुख्य वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण, शहर अभियंता राजन पाटील, जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्‍चर अशोक भालकर आदी उपस्थित होते.

कंपनीचे संचालक म्हणून स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. संबंधित पदांवर नवीन निवडी झाल्याने हा बदल करण्यात आला. सभेमध्ये कंपनीच्या आर्थिक वर्ष 2019-20 च्या सुधारित अंदाजपत्रकाबाबत चर्चा करण्यात आली. अंदाजपत्रकात नवीन लेखाशीर्षाची निर्मिती व अंदाजपत्रकाच्या विनियोगास मान्यता देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबतचे अधिकार प्रदान करण्याबाबत चर्चा होऊन त्याला मंजुरी दिली.

पिंपळे गुरवमध्ये रस्ते, लिनियल गार्डनचा विस्तार

पिंपळे गुरव येथील रस्ते, लिनियल गार्डन विस्तार, प्राथमिक आरोग्य केंद्राची सुधारणा करणे, म्युनिसिपल ई-क्‍लासरूम प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे कामी पीएमयू मार्फत अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्यास सभेने मंजुरी दिली. सभागृह व प्रसारण विकासाच्या अहवालास मान्यता देण्यात आली. स्टार्टअप्स आणि इलेक्‍ट्रीक सायकली/स्कुटर शेअरिंग प्रकल्पासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली. पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्‍युबेशन सेंटरसाठी 50 लाख रुपयांच्या खर्चासही मंजुरी दिली.

स्मार्ट सिटी कंपनीच्या पॅन सिटी प्रकल्पांतर्गत व्हेरिएबल मेसेज साइनबोर्ड, सिटी मोबाइल ऍप, स्मार्ट कियॉस्क आणि वाय-फायसारख्या डिजिटल सेवा मोफत देण्यासाठी मोनेटायझिंग एजन्सी म्हणून लिमा टेक्‍नोजीज यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. सर्व आय. टी. पायाभूत सुविधांची तपासणी करण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सी म्हणून पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियुक्तीस सभेने मंजुरी दिली. कंपनी सेक्रेटरी, लेखापाल तसेच सल्लागार चार्टर्ड अकाऊंट यांची 2020-21 या आर्थिक वर्षासाठी नेमणूक करण्याबाबत चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली.

Post a comment

0 Comments