कोल्हापूर. राधानगरी चे दरवाजे बंद.


      राधानगरीचे दरवाजे बंद

PRESS MEDIA LIVE :  कोल्हापूर :  भरत घोंगडे 

पात्राबाहेर पडलेली पंचगंगा नऊ दिवसांनंतर गुरुवारी रात्री उशिरा पात्रात गेली. पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सुरू असलेले दोन्ही स्वयंचलित दरवाजे बंद झाले. आजरा तालुक्यातील चित्री धरण दुपारी पूर्ण क्षमतेने भरले. जिल्ह्यात शुक्रवारी पाऊस होईल असा अंदाज आहे. कोयना धरणातूनही उद्यापासून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आज काही भागात पाऊस झाला. शहर आणि परिसरातही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, पावसाची संततधार नसल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत गेली. गुरुवारी सकाळी पंचगंगेची पातळी 32 फूट 10 इंचावर होती.रात्री ती 30 फूट 11 इंचापर्यंत खाली आली. यामुळे पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्रात जाऊ लागले आहे. पंचगंगा विहार मित्र मंडळाच्या बाजूला काहीसे पाणी रात्री उशिरापर्यंत पात्राबाहेर होते.  राधानगरी धरणाचे सहा व तीन क्रमांकाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले होते. सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी सहाव्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला. दिवसभर पावसाचा जोर साधारण राहिल्याने धरणाचा सुरू असलेला तिसर्‍या क्रमांकाचा दरवाजाही रात्री पावणेआठ वाजता बंद झाला. यामुळे राधानगरी धरणातून केवळ वीज निर्मितीसाठी 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणात 80 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामुळे उद्या शुक्रवारी सकाळी धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. मात्र, सध्या त्याचा जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीवर काहीही परिणाम होणार नाही.

आजरा तालुक्यातील 1.88 टीएमसी क्षमतेचे चित्री धरण गुरुवारी दुपारी सव्वाएक वाजता पूर्ण क्षमतेने भरले. या धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू झाला आहे. जिल्ह्यात आजअखेर राधानगरी, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे ही पाच धरणे पूर्ण भरली आहेत. चित्री धरण भरल्याने जिल्ह्यातील पूर्ण भरलेल्या धरणांची संख्या सहा झाली आहे. कडवी आणि पाटगाव ही धरणेही भरत आली असून या दोन्ही धरणात अनुक्रमे 95 व 94 टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणातील विसर्गामुळे नद्यांची पाणी पातळी संथ गतीने कमी होत चालली आहे. परिणामी अद्याप 25 बंधारे पाण्याखाली आहेत. यामध्ये पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील पाच, दूधगंगा नदीवरील चार, वेदगंगा नदीवरील चार, वारणा नदीवरील दोन तर कुंभी, कासारी आणि तुळशी नदीवरील प्रत्येकी एका बंधार्‍यांवर अद्याप पाणी आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 15.95 मि.मी.पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस राधानगरीत 31.17 मि.मी. इतका झाला. गगनबावड्यात 30.50 मि.मी., चंदगडमध्ये 23.67 मि.मी., शाहूवाडीत 25.17 मि.मी., भुदरगडमध्ये 20 मि.मी.,पन्हाळ्यात 19.29 मि.मी. तर आजर्‍यात 18 मि.मी. पाऊस झाला. चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र, बुधवारी सकाळी आठ ते गुरूवारी सकाळी आठ या 24 तासात अतिवृष्टीची नोंद झाली.

Post a comment

0 Comments