इचलकरंजी . पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर

 
 

पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हेतर कष्टकऱ्यांच्या, दीनदलितांच्या, वंचितांच्या घामावर तरलेली आहे.

                                 प्रसाद कुलकर्णी

PRESS MEDIA LIVE :. इचलकरंजी( प्रतिनिधी) 

इचलकरंजी ता.१६,पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे तर कष्टकऱ्यांच्या, दीनदलितांच्या, वंचितांच्या घामावर तरलेली आहे ही स्पष्ट भूमिका घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी  साहित्याची निर्मिती केली. कथा,कादंबरी,नाटके,लोकनाट्ये याप्रमाणेच लावणी पासून पोवाड्यापर्यंत आणि स्तवनापासून गणापर्यंत त्यांनी लिहिलेलं काव्य व्यक्तीच्या दास्यत्वाच्या शृंखला तोडणारे आहे.भारतीय जनतेच्या स्वातंत्र्याप्रमाणेच जगभरची जनता स्वतंत्र व्हावी, साम्राज्यवाद व फॅसिझम नष्ट व्हावा  म्हणूनच स्टालिनग्राडचा लढा देणाऱ्या कामगारां प्रमाणेच मुंबईचा कष्टकरीही अण्णा भाऊंच्या कवितेत येतो. ही कष्ट व कष्टकऱ्यांशी बांधिलकी अण्णा भाऊंना कवी म्हणून अधिक उंचीवर घेऊन जाते,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते इचलकरंजी नगरपरिषद, शिक्षण समिती यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ऑनलाइन फेसबूक व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ' अण्णाभाऊंच्या साहित्यातील काव्य ' या विषयावर बोलत होते.नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली  या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.

                       प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, अण्णाभाऊंच्या लेखणीत समूहमन चेतवण्याची क्षमता आहे. राजकीय ,सामाजिक, आर्थिक, संस्कृती घडामोडींवर त्यांची कविता प्रखर भाष्य करते. आपल्या इतिहासाचे,परंपरेचे ,आव्हानांचे,वर्तमानाचे, भविष्याचे भान त्यांच्या कवितेत दिसते. भांडवली व्यवस्था श्रमाचे मोल योग्य पद्धतीने करत नाही याची तीव्र बोच त्यांची कविता व्यक्त करते. कादंबरी,कथा,नाटक,वगनाट्य ,कवितेसह सर्व साहित्यप्रकार लिहिणाऱ्या अण्णा भाऊंवर कार्ल मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी साहित्यातून मार्क्सवादी पद्धतीचे विश्लेषण केले आणि आंबेडकरी विचारधारेतून अन्वयार्थ शोधला. सर्वसामान्यांचे जीवन सुखी व्हायचे असेल, त्यांची सर्वांगीण उन्नती व्हायची असेल तर मार्क्‍स व  आंबेडकर यांची विचारधारा महत्त्वाची आहे असे ते सांगत होते. म्हणून तर ' जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव ' असे अण्णाभाऊ लिहीत होते.इचलकरंजी नगरपतिषद व शिक्षण समितीच्या वतीने आयोजित या सात दिवसीय व्याख्यानमालेत प्राचार्य डॉ.सुनीलकुमार लवटे, डॉ.सोमनाथ कदम,डॉ.गिरीश मोरे,केशव वाघमारे प्रा.डॉ.अमर कांबळे,अनिल म्हमाणे या मान्यवर अभ्यासकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील व विचारधारेतील विविध पैलूंवर भाष्य केले.या ऑनलाइन व्याख्यानमालेला चांगला प्रतिसाद मिळाला.


फोटो : इचलकरंजी नगरपरिषदेच्या व्याख्यानमालेत ' अण्णाभाऊंच्या साहित्यातील काव्य ' या विषयावर बोलतांना प्रसाद कुलकर्णी

Post a comment

0 Comments