हातकणंगलेतील काही नगरसेवकांनी मारला डल्ला.

बिगर रेशन कार्ड धारकांना वाटपासाठी आलेला हजारो किलो रेशन धान्यावर

हातकणंगलेतील काही नगरसेवकांनी  मारला डल्ला.

लॉकडाऊन काळातील धक्का दायक प्रकार  उघडकीस.

PRESS MEDIA LIVE : हातकणंगले :

हातकणंगले : लॉकडाउनमध्ये बिगर रेशनकार्डधारकांना वाटपासाठी आलेल्या हजारो किलो धान्यावर हातकणंगलेतील काही नगरसेवकांनी डल्ला मारला असून त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हितसंबंध जपण्यासाठी संबंधित नगरसेवकांनी केलेल्या कारभारामुळे अनेक मूळ लाभार्थी वंचित राहिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशनकार्ड नाही, असे नागरिक रेशनकार्डअभावी उपाशी राहून नयेत, यासाठी शासनाने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत मे आणि जून दोन महिन्यांसाठी माणसी दहा किलो तांदूळ त्यासाठी सर्वेक्षण करून ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांची यादी बनवण्याची सूचना दिली.

हातकणंगले नगरपंचायतीने यानुसार शहरातील 677 जणांची यादी तयार करून शासनाकडे पाठवली. शासनाने धान्य वाटपासाठी एका संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाची निवड करून 6770 किलो तांदूळ त्या दुकानदारांकडे पाठवले. धान्य वाटताना यादीतील नावाप्रमाणे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि सही घेण्याचे आदेश शासनाने दिले. तसेच जे लाभार्थी धान्य नेणार नाहीत, त्यांचे शिल्लक तांदूळ परत देण्याच्याही सूचना दिल्या.

हे धान्य दुकानात आल्यानंतर संबंधित दुकानदाराने काही लाभार्थ्यांना धान्य वाटप केले. मात्र, याची माहिती मिळताच काही नगरसेवकांनी दुकानदाराला दमदाटी करत आमच्या वॉर्डातील लोकांना आम्ही वाटतो, असे म्हणत हजारो किलो तांदूळ स्वतःच्या ताब्यात घेतले. त्यांनी स्वतःचे हितसंबंध जपत आपल्याच कार्यकर्त्यांना धान्य दिले. यामुळे अनेक मूळ लाभार्थी वंचित राहिले.

शिवाय नगरसेवकांनी जादा तांदळाची मागणी केल्यानंतर दुसऱ्या एका स्वस्त धान्य दुकानातून तब्बल वीस पोती धान्य घेऊन नगरसेवकांना दिल्याचीही कबुली संबंधिताने दिली आहे. त्यामुळे त्या दुकानदारांकडे एवढे अतिरिक्त तांदूळ कोठून आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाकडून मोफत वाटपासाठी आलेल्या धान्यांचा संबंधित नगरसेवकांनी स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी गैरवापर केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

              राजकारणात आमचा बळी जाणार

काही नगरसेवकांच्या दमदाटीमुळे त्यांना नाईलाजास्तव तांदूळ दिले आहेत. मात्र, यांच्या राजकारणात आमचा बळी जाणार आहे.

- स्वस्त धान्य दुकानचालक

                कारवाई झाली पाहिजे

या प्रकाराची माहिती घेतली असता काही नगरसेवकांनी हजारो किलो धान्य घेऊनही त्याचे वाटप केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जे दोषी आहेत, त्यांच्यावर निश्‍चित कारवाई झाली पाहिजे.

- अरुणकुमार जानवेकर, नगराध्यक्ष, हातकणंगले 

                 कोणाचीही  गय केली जाणार नाही

या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर निश्‍चितच कठोर कारवाई केली जाईल. यात कोणाचीही गय केली जाणार नाही.

- प्रदीप उबाळे, तहसीलदार, हातकणंगले देण्याची योजना जाहीर केली.

Post a comment

0 Comments