रात्री दोन वाजता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर


रात्री दोन वाजता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर  कोरोना बाधित रुग्णास  रुग्णालयात दाखल करून घेतले.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी / हातकणंगले  ( मनु फरास )

हातकणंगले : सख्ख्या भावाला घेऊन दिवसभर सीपीआर रुग्णालयासह तब्बल आठ रुग्णालयांत जाऊन आले; परंतु तरीही कोरोनाबाधित रुग्णास दाखल करून घेण्यास नकार. शेवटी वैतागून रात्री १०.३० वाजता सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट प्रसारित केली. त्याची जिल्हाधिकारी दौलत देसाई व पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दखल घेतली.

कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयास त्यांनी आदेश दिल्यानंतर रुग्णास रात्री दोन वाजता बेड उपलब्ध झाल्याची माहिती रुग्णाच्या भावाने मंगळवारी दिली. भावाची प्रकृती आता सुधारत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्र्यापासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वजण रुग्णांस उपचाराविना परत पाठवू नका, असे वारंवार बजावत असताना व कारवाईचा इशारा दिला असतानाही रुग्णालये रुग्णांना दाखलच करून घेत नसल्याचा अनुभव अनेकांना येत आहे.असाच अनुभव हातकणंगले तालुक्यातील एका व्यक्तीस आला. त्यांच्या भावाने ही माहिती सोशल मीडियावर प्रसारित केली. घडले ते असे : पांडुरंग केरबा बिडकर (वय ५८) यांची ८ ऑगस्टला थंडी-तापाने प्रकृती बिघडली. अतिग्रेतील घोडावत कोविड सेंटरमध्ये त्यांनी ८ ऑगस्टला स्राव दिला. त्याचा अहवाल १० ऑगस्टपर्यंत आला नाही. त्यांची प्रकृती खालावत गेली. ऑक्सिजन पातळी ७४ पर्यंत खाली आल्याने घोडावतमध्ये पुन्हा रॅपिड टेस्ट केली. ती निगेटिव्ह आली. खासगी रक्त तपासणीमध्ये त्यांना डेग्यूची लक्षणे दिसली. रॅपिड टेस्ट निगेटिव्ह, सरकारी टेस्ट निगेटिव्ह आणि खासगी टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला.

घोडावत सेंटरचे वैद्यकीय अधिकारी ड़ॉ. उत्तम मदने यांनी रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आल्याने रुग्णाला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही कोल्हापुरातील शाहूपुरीतील खासगी रुग्णालयात घेऊन गेलो. त्यांनी रुग्णाचा एचआरसीटी खासगी लॅबमध्ये करण्याचा सल्ला दिला. तो अहवाल पॉझिटिव्ह आला. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर या रुग्णालयाने त्याला दाखल करून घेतले नाही. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत भावाला घेऊन फिरत होतो. सरकारी मदत कक्षाकडे फोन केला. त्यांनी शेंडा पार्क आणि महासैनिक दरबार हॉल येथे जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे महासैनिक दरबार येथे गेलो. त्यांनीही कोरोनाची भीती घालून नाकारले. शेवटी रात्री ११ वाजता घरी जाताना घोडावतच्या डॉ. मदने यांना फोन करून भावास रात्रीसाठी ठेवून घ्या व ऑक्सिजन लावा, अशी विनंती केली. त्यावेळी आॉक्सिजन पातळी ५४ वर आली होती. दिवसभर सर्व दवाखान्यांनी दिलेला नकार व उपचार होत नसल्याचे पाहून मन सुन्न झाले आणि रात्री ११ वाजता सोशल मीडियावर उपचार होत नसल्याचा संदेश प्रसारित केला. त्याची दखल घेऊन रात्री १२ वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सीपीआर रुग्णालयामधून फोन आले. जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री एक वाजता भावासाठी सीपीआर आणि खासगी रुग्णालयात व्हेंटेलेटर बेड उपलब्ध करून दिला. रात्री दोन वाजता आम्ही भावास खासगी रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती बरी आहे.

             तीन लाख भरा...

तब्बल चार तास मी सीपीआर रुग्णालयासह तब्बल आठ रुग्णालयांमध्ये भावाला दाखल करण्यासाठी घेऊन गेलो. कोणीही दाद दिली नाही. काही खासगी दवाखान्यांनी तर प्रतिदिवस दहा हजार याप्रमाणे तीन लाख भरा; तरच उपचार करू, असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post