तासगाव ;

वायफळेत क्वारंटाईनमधील जवानाला अपमानास्पद वागणूकप्रकरणी उद्या तहसीलदारांना निवेदन देणार : शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष व माजी सैनिक बाळासाहेब पवार यांची माहिती
          दोषींवर कारवाईची मागणी.


PRESS MEDIA LIVE :   ( प्रतिनिधी )

तासगाव :  _लष्करात कार्यरत असणाऱ्या दिलीप नलवडे या जवानाला तालुक्यातील वायफळे येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली. 'गावची बदनामी करायला इथं आला आहेस काय. मी काय तुला पत्र पाठवलं होतं काय. मी तुला बोलवलं होतं काय. आता तुला सुट्टी नाही', अशी दमबाजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने 'त्या' जवानाला केली. या घटनेचे संतप्त पडसाद आता तालुक्यात उमटू लागले आहेत. सैनिकाचा अपमान सहन करून घेणार नाही, असा इशारा देत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष व माजी सैनिक बाळासाहेब पवार यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत उद्या (सोमवार) तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देणार आहे, असे पवार यांनी सांगितले._

      _अरुणाचल प्रदेश येथे लष्करात कार्यरत असणारा वायफळे येथील दिलीप नलवडे हा जवान आठवडाभरापूर्वी सुटीवर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने त्याला बाळासाहेब देसाई हायस्कुल या शाळेत क्वारंटाईन केले आहे. मात्र या शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. कौले फुटल्याने शाळेची खोली गळत आहे. खोलीतील फरशी घुशीने उखडली आहे. शाळेच्या भोवताली प्रचंड गवत उगवले आहे. खोलीचे दार खालच्या बाजूने तुटले आहे. त्यामुळे सभोवतालच्या गवतातून एखादा साप खोलीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सलग दोन - तीन दिवस शाळेत वीज नव्हती. त्यामुळे टाकीतील उपलब्ध पाणीही संपले होते. परिणामी या जवानाला अंघोळ आणि शौचास जाण्याचीही अडचण निर्माण झाली होती. या जवानाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे अंधाऱ्या खोलीत एक - एक दिवस घालवावा लागत होता. अक्षरशः नरकयातना त्याला सोसाव्या लागल्या._

     _याबाबत जवानाने उपसरपंच अशोक नलवडे यांना सलग दोन - तीन दिवस फोन करून आपली समस्या सांगितली. मात्र उपसरपंच नलवडे यांनी केवळ बघतो, करतो असे म्हणून वेळ मारून नेली._ त्यानंतर एका पदाधिकाऱ्याने संबंधित जवानाला 'तू गावची बदनामी करायला इथे आला आहेस काय. तुला बातम्या कोणी द्यायला सांगितल्या. तुला पत्र पाठवून मी बोलवून घेतले काय. तुला आता सुट्टी नाही', अशी दमबाजी केली. यावेळी हा जवान व दमबाजी करणारा पदाधिकारी यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. तलाठी अमोल जंगम यांच्यासमोर हा प्रकार घडला._

       _दरम्यान, एका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने जवानाला दमबाजी केल्याने त्याचे संतप्त पडसाद तालुक्यात उमटत आहेत. या पदाधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष व माजी सैनिक बाळासाहेब पवार यांनी केली आहे. याबाबत उद्या (सोमवार) तहसीलदार ढवळे यांना निवेदन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले._

*प्रसंगी वायफळे ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणार : पवार*

     _गावातील एखादा मुलगा सैन्य दलात सीमेवर भारत मातेचे रक्षण करतोय, याचा गावकऱ्यांना अभिमान पाहिजे. तो गावाकडे येऊन क्वारंटाईन झाला म्हणजे तो गुन्हेगार नाही. त्याला मूलभूत सोयी - सुविधा पुरवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र वायफळे ग्रामपंचायतीने दिलीप नलवडे या जवानाला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. त्याला दोन - तीन दिवस वीज नसलेल्या अंधाऱ्या खोलीत ठेवले. याबाबत या जवानाने माध्यमांकडे धाव घेल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. एका पदाधिकाऱ्याने या जवानाला दमबाजी केली. 'गावची बदनामी करायला इथं आला आहेस काय', अशी विचारणा केली. खरं तर कोणताही जवान गावचे नाव रोशन करायला फौजमध्ये जातो. गावाला त्याच्यावर अभिमानच पाहिजे. गावची बदनामी तो कशाला करेल. जर त्याला वेळेत सोयी - सुविधा मिळाल्या असत्या तर त्याला माध्यमांकडे जायची गरजच भासली नसती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने आमच्या जवानाला दमबाजी करून अपमानास्पद वागणूक दिली आहे. याप्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यावर कारवाई व्हावी. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तहसीलदारांकडे करणार आहे. जर संबंधितावर कारवाई झाली नाही तर प्रसंगी वायफळे ग्रामपंचायतीसमोर उपोषण करणार, असा इशारा बाळासाहेब पवार यांनी दिला_

Post a Comment

Previous Post Next Post