इचलकरंजी :

महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत नेते आणि समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष प्रा.एन.डी. पाटील बुधवार ता. १५ जुलै २०२० रोजी ब्यांणव्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने  त्यांनी लिहिलेली " शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? "आणि "शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत ? "या दोन पुस्तकांच्या नव्या आवृत्ती प्रकाशित होत आहेत. ब्यांणाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने एन.डी.सरांना भरभरून शुभेच्छा. यानिमित्ताने या प्रचंड ऊर्जास्त्रोताच्या जीवन व कार्याविषयी....
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी. ( ९८ ५०८ ३० २९० )

प्रा. डॉ. एन. डी.पाटील. उपेक्षितांचे पहाडी आधारवड.
---------------------------------------- - ---------------   
 
PRESS MEDIA LIVE :.   इचलकरंजी :

समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत व नेते प्रा. डॉ.एन.डी. पाटील बुधवार दि. १५जुलै २०२० रोजी ब्यांणाव्या  वर्षात पदार्पण करत आहेत. महाराष्ट्रातील यच्चयावत प्रबोधन,परिवर्तन, पुरोगामी, समतावादी ,समाजवादी, साम्यवादी ,विज्ञानवादी,विवेकवादी अशा सर्व चळवळींचे पहाडी नेतृत्व असलेल्या प्रा.डॉ. एन.डी. पाटील यांचा हा वाढदिवस सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंददायी व प्रेरणादायी आहे.या वयातही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी उतरणार्‍या प्रा.डॉ.एन.डी.पाटील सरांना  यानिमित्ताने भरभरून शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो आणि गेल्या सात दशकांत प्रमाणेच त्यांचे मार्गदर्शन व नेतृत्व सर्व चळवळीना मिळत राहो.महाराष्ट्राच्या या थोर सुपुत्राचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची संधी महाराष्ट्राला नक्कीच मिळणार आहे.यात शंका नाही.कारण अथक परिश्रम करणाऱ्या सरांच्या शब्दकोशात थकणे हा शब्दच नाही.अविश्रांत वाटचाल आणि  एन.डी. हे समानार्थी शब्द आहेत.
             सुप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो असे म्हणाले होते, " मला थकवा येत नाही कारण मी काम करत असताना चपलांप्रमाणेच माझं शरीरही बाहेर काढून ठेवत असतो ". हे वाक्य मला एन.डी. सरांकडे पाहिले की नेहमी आठवते. कारण गेल्या साडे तीन दशकाहून अधिक काळ मी त्यांना जवळून पाहतोय. ते सतत कामाच्या रगाड्यात व्यस्त व व्यग्र असतात. दिवसाचे चोवीस तास ही अपुरे वाटावेत आणि सलग चार सहा तासांची झोप म्हणजे चैन वाटावी इतका त्यांचा कामाचा व्याप असतो. लोकांची गर्दी, कार्यक्रमाची आखणी व कृती, प्रचंड स्वरूपाचे अद्ययावत वाचन,अफाट व्यासंग, पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे होणारा प्रवास, सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत गाऱ्हाण्यांपासून संस्थात्मक अडचणीतून मार्ग काढण्याची धडपड ,हे सारे वर्षानुवर्षे नव्हे तर दशकांउदशके सुरू आहे. गेल्या दहा-बारा वर्षात मुंबई ऐवजी कोल्हापूरला राहायला आल्यानंतरही ही धावपळ सुरूच आहे.प्रकृतीच्या तक्रारी वयपरत्वे जाणवत असूनही सर त्या सदैव बाजूला ठेवून कार्यरत असतात.एक पाय व एक किडणीच गेली अनेक वर्षे सक्रिय असणारे सर म्हणतात ,' मी कोणत्याही आंदोलनासाठी एका पायावर आणि एका किडनीवर लढण्यासाठी सदैव तयार आहे". ही प्रेरण,हे बळ एन.डी. सरांची खासियत आहे आणि माझ्यासारख्या त्यांच्या हजारो सहकाऱ्यांचे ते पाठबळ आहे.मूर्तिमंत उर्जासागर म्हणजेच एन.डी.सर.
             खरेतर ऐन तारुण्यापासून सुरू असलेली ही त्यांची धावपळीची जीवननिष्ठा व विचारनिष्ठा पाहून वीस वर्षांपूर्वीच एन.डी.सरांना त्यांच्या डॉक्टर मित्रांनी 'पाच दिवसांचा आठवडा करा 'आणि 'थोडी विश्रांती घेत जा ' असा सल्ला दिला होता. पण तो त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या अथक परिश्रमाचे एक उदाहरण यानिमित्ताने आठवते.एकवीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ साली समाजवादी प्रबोधिनी च्या प्रबोधन प्रकाशन माले द्वारे मध्ये एन.डी.सरांचे  "महर्षी शिंदे  : उपेक्षित महात्मा " ही पुस्तिका प्रकाशित करायचे ठरले होते. आचार्य शांतारामबापू गरुड आणि मी एन.डी.सरांना त्याची वारंवार आठवण करून देत होतो. परंतु सरांच्या अत्यंत व्यस्त दिनक्रमात मुळे लेखनासाठी उसंत मिळत नव्हती.पुस्तिका प्रकाशनाची जाहीर केलेली तारीख जवळ येत होती. बहुतेक ते प्रकाशन पुढे ढकलावे लागणार असे मला व बापूंना वाटत होते. पण शब्दांचे पक्के असणाऱ्या सरांचा एक दिवस संध्याकाळी पाचच्या दरम्यान मला फोन आला.त्यावेळी मोबाईल नव्हते. ते मला म्हणाले ,मी बेळगावात आहे. येथून निघून प्रबोधिनीत येतो आहे.मी या म्हणालो,पण पुढे घडले ते फार महत्वाचे आहे.रात्री आठ वाजता सर आले. आल्यावर थोड्या गप्पा व जेवण आवरून त्यांनी समाजवादी प्रबोधिनीच्या  कार्यालयात कागदांची चळत  घेऊन लिहायला सुरुवात केली.मी त्यांच्या जवळच खुर्चीवर बसलो होतो. मी त्यांना म्हटले, सर तुम्ही सांगा मी लिहून घेतो. तर ते म्हणाले, नाही रे ,मला डिटेक्ट करायची सवय नाही.स्वतः लिहिले की लेखनाची भट्टीही छान जमते. आणि ते मलाच म्हणाले, मी लिहीत बसतो तू जावून झोप. पण एवढा प्रचंड असामान्य ऊर्जास्त्रोत समोर साक्षात लिहीत बसलेला असताना मला झोप येणे अशक्य होते.ते लिहितील तशी पाने  मला वाचायला देत होते. ती वाचून मी स्तिमित होत होतो. त्यांची अफाट स्मरणशक्ती आणि व्यासंग त्यांच्या शब्दाशब्दातून दिसून येत होता.त्यांच्या त्या लेखनाचा पहिला वाचक मी होतो. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नावाचा महामानव मी एन.डी.पाटील नावाच्या दुसऱ्या महामानवाकडून समजून घेत होतो. अखेर सलग आठ-नऊ तास एक टाकी,एक हाती लिहिलेल्या त्या पुस्तिकेचे हस्तलिखित सकाळी सहा वाजता एन.डी.नी पूर्ण तयार केले. तोपर्यंत शांतारामबापूंही  उठून कार्यालयात आले होते. त्यांना आश्चर्य वाटले पण आपल्या सहकाऱ्याची खात्रीही होती. चहा घेऊन थोड्या गप्पा मारून सर पुढच्या कामाला लगेच साताऱ्याला निघून गेले. ही इतकी अस्सल ऊर्जा फक्त आणि फक्त विचारांच्या निष्ठेतूनच येत असते. एन.डी. सरांच्या सहवासातील शेकडो आठवणी पैकी ही आठवणही माझ्या काळजावर कायमची कोरली गेली आहे.
             २०१२-१३ साली भारताच्या केंद्र सरकारने भारतातील विविध राज्यातील विविध क्षेत्रात महनीय व उत्तुंग  कामगिरी करणाऱ्या आणि वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणाऱ्या मान्यवरांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व ,त्यांची जडणघडण स्पष्ट करणाऱ्या सविस्तर मुलाखती संकलित करण्याची योजना आखली होती. आकाशाच्या उंचीच्या या व्यक्तिमत्त्वाची सर्वांगीण ओळख पुढच्या पिढ्यानाही झाली पाहिजे हा या मुलाखती मागचा हेतू होता. सर  ब्यांणाव्या वर्षात पदार्पण करत असताना मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, त्या मालिकेमध्ये सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी बाबत सरांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली होती. ही मुलाखत सलग चार दिवस आकाशवाणी कोल्हापूरच्या स्टुडिओत रेकॉर्ड केली जात होती. जवळजवळ  सोळा तासांची ही दीर्घ मुलाखत आहे. यथावकाश सरकारद्वारे त्याचे प्रसारण व शब्दांकन करून प्रकाशनही केले जाणार होते. त्याचे ग्रंथरूपाने इंग्रजी भाषांतरही होणार होते. अशी ती योजना होती. पण नंतर सरकार बदलले.आता त्या मुलाखतीही कदाचित दाबलेल्या असाव्यात कारण विरोधी विचारधारेच्या  विचारवंतांना काही बोलण्याचा हक्क आहे अशी विद्यमान सरकारची आणि त्यांच्या विचारसारणीची मानसिकताच नाही. त्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे अथवा सरांकडे ही नाही. पण त्या प्रदीर्घ मुलाखतीतून एन.डी.सरांची सारी वाटचाल, त्यांचे अंतरंग, त्यांची वैचारिक भूमिका अधोरेखित झाली आहे. त्या मुलाखतीच्या आधारे एक उत्तम चरित्र आकाराला येऊ शकले असते. कारण अनेक बाबी सर त्या मुलाखतीद्वारे प्रथमच बोललेले आहेत.
         आशिक्षिततेशी जन्मजात सांगड असणाऱ्या एका गरीब शेतकरी कुटुंबात सरांचा जन्म झाला.१५ जुलै १९२९ हा तो दिवस होता. शेतकरी गरीब कुटुंबातून आलेला हा माणूस काबाडकष्ट करत आणि मैलोन मैल पायपीट करत शिकला. 'कमवा आणि शिका ' या योजनेचे आचरण करत ते एम.ए.एल.एल.बी. झाले. शिक्षक-प्राध्यापक-प्राचार्यही झाले. नोकरीतून सुखी जीवनाची हमी निर्माण झालेली असतानाच अवघी सहा सात वर्षे त्यांनी ती नोकरी केली आणि सोडून दिली. ऐन तारुण्यात गिरणी कामगार युनियन चा सेक्रेटरी म्हणून त्यांनी नाममात्र जीवन वेतनावर कार्यकर्ता म्हणून समाजकारणात राजकारणात पदार्पण केले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाने आणि राज्यघटनेने स्वातंत्र्य , सार्वभौमत्व,एकात्मता ,धर्मनिरपेक्षता समाजवाद ,लोकशाही ही मूल्ये रुजवली.या संकल्पनांवर पूर्ण निष्ठा ठेवून तो विचार समाजात रुजवण्यासाठी आयुष्य कारणी लावायच्या उर्मीनेच एन.डी.सर आजही कार्यरत आहेत. सर्वसामान्य जनतेशी त्यांची जुळलेली नाळ यामुळेच हे घडते आहे. त्या अनमोल बांधिलकीचेच हे फलित आहे.
          विद्यार्थीदशेमध्ये स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या एनडीनी त्यावेळीही कारावास भोगला आहे, गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ ,साराबंदी चळवळ, शेतकरी दिंडी ,दुष्काळ निवारण मोर्चा, शेतकरी आंदोलने, शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठीच्या लढा,सेझ विरोधी आंदोलन ,उच्च न्यायालय खंडपीठ ,शिक्षण विषयक श्वेतपत्रिका ,एन्रॉन विरोधी आंदोलन, टोलविरोधी आंदोलन, वीजदरवाढ विरोधी आंदोलन ,पिण्याच्या पणीहक्काचे आंदोलन, कापूस दर आंदोलन ,शिक्षण बचाओ आंदोलन, जागतिकीकरण विरोधी लढा यासारखी शेकडो आंदोलने गेल्या काही दशकात एन.डी.सरांनी लढली व यशस्वी केली. काहींच्या पूर्ततेसाठी ते आजही लढत आहेत. जनतेच्या पैशातून उभारलेला साखर कारखाना वाचविण्यापासून ते सेझच्या निमित्ताने  अंबानीसारख्या भांडवलदारांच्या घशात गोरगरिबांची हजारो एकर गेलेली जमीन परत मिळवण्यात एन.डी.यशस्वी झाले आहेत.अशा शेकडो यशोगाथा सरांच्या सांगता येतील. जनतेसाठी केलेल्या आंदोलनात त्यांना अनेकदा लाठीमार सोसावा लागला आहे. तुरुंगवास पत्करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर गोळीबारही झेलावा लागलाआहे. इस्लामपुरातील लढ्यात आपल्या पुतण्या बरोबरच काही सहकाऱ्यांचे हौतात्म्यही सरांनी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी चेहऱ्यावर दुःख न दाखवता पचवले आहे. रस्त्यावरच्या आणि सभागृहातील लढ्याचा एवढा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या दुर्मिळातील दुर्मिळ यशस्वी नेत्यांपैकी एनडी एक आहेत.
          शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन पण तमाम चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या एन.डी.नी महाराष्ट्र विधानसभा  आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद, आघाडी सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष पद भूषवलेले आहे. तेवीस वर्षे आमदार असलेल्या सरांनी महाराष्ट्राचे सहकार मंत्रीपदही भूषवले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेले काम आणि घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या दीर्घकालीन हिताचे ठरलेले आहेत. एक अभ्यासू, जागृक ,झुंजार ,निस्पृह आणि कृतिशील विचारवंत,  लढवय्ये नेतृत्व म्हणून सरांचा लौकिक महाराष्ट्रभर आणि देशभर पसरलेला आहे.केंद्र सरकारच्या बी -बियाणे महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे व्यासंगामुळे चालून आले होते. तीव्र स्मरणशक्ती, लालित्यपूर्ण ओघवती भाषा ,कथा कवितांची पेरणी करत प्रसंगाचे गांभीर्य ध्यानात आणून देण्याची अद्भुत शैली, आणि शब्दाशब्दातून व्यक्त होणारी सामान्यांशी नाळ ही वैशिष्ट्ये असणारे त्यांचे भाषण आणि लेखन म्हणजे एक अनमोल  ठेवा असतो. सत्ताधाऱ्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरही एक प्रकारचा नैतिक धाक असणारे मात्र सर्व समस्यांतून निश्चितपणे मार्ग काढू शकतील असा सर्वाना विश्वास देणारे एन.डी.सरांसारखे दुसरी व्यक्तिमत्व वर्तमान महाराष्ट्रात नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तिका व  लेख हे मौलिक स्वरूपाचे विचारधन आहे. त्यातीलच दोन पुस्तकांचे आज पुनर्प्रकाशन आज होत आहे ही अतिशय चांगली घटना आहे.
          साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे एन.डी.सरांच्याबाबत तंतोतंत खरेआहे.त्यामुळेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धुताना एनडी दिसले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता म्हणून आलेले मानधन आपल्याबरोबर वाटचाल करणाऱ्या गोरगरीब कार्यकर्त्यात वाटून त्यांना सुखाचे दोन दिवस देऊ पाहणारे एन.डी. दिसतात. तसेच आपल्याला मिळालेल्या लाखो रुपयांच्या पुरस्काराच्या रकमा त्याच व्यासपीठावरून  सामाजिक, शैक्षणिक काम करणार्‍या  संस्थांना, चळवळींना ते देताना दिसतात. मोठमोठी पदे चालून आलेली असतानाही ती नम्रपणे नाकारणारे व त्याचा कोणापुढेही उल्लेख न करणारे एन.डी. दिसतात. तसेच विधान परिषदेसाठी पक्षाने उमेदवारी दिलेली असतानाही ,निवडून येण्याची खात्री असतानाही ती संधी आपल्या सहकाऱ्यांनाही मिळावी या भावनेने उमेदवारी नम्रपणाने नाकारणारे एन.डी.हीदिसतात. समाजकारणात आणि राजकारणात इतकी निकोप आणि नितळ दृष्टी घेऊन जगण्यासाठी फार मोठे काळीज लागते.फार अपवादात्मक  व्यक्तींकडे असणारे असे काळीज एन.डी. सरांकडे आहे.
          पायाचे ऑपरेशन होऊन हातात आधारासाठी काठी घ्यावी लागेल पर्यंत एन.डी. सर्वत्र एसटीनेच प्रवास करत होते. आज व्हीलचेअरवर बसूनही ते आंदोलनाच्याअग्रभागी असतात. निरनिराळ्या लढ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील गाव व गाव , तालुका न  तालुका गेल्या सत्तर वर्षात शब्दशः एन.डी.नी चालून काढला आहे.त्यामुळे त्यांच्या बरोबरच्या प्रवासात एखाद्यावेळी गाडीचा चालक रस्ता चुकेलं पण सरांना सारे रस्ते माहित असतात असा अनुभव येतो. महाराष्ट्रभर पसरलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचा ध्यास त्यांच्या राजकीय सामाजिक चळवळी इतकाच त्यांना लागलेला असतो.
                 सर्वसामान्यांचे संसार उभे करताना,लढे लढताना एन.डी. सर व्यावहारिक अर्थाने स्वतःच्या संसारात फारसे अडकून पडले नाहीत. अर्थात कमालीचा जिव्हाळा असतोच असतो. पण समाजाचा संसार करण्याची अशी पूर्ण मोकळीक एन.डी. सरांना मिळाली आहे याचे सर्व श्रेय अर्थातच त्यांच्या अर्धांगिनी सरोजताई उर्फ माईना द्यावे लागेल.एन.डी.सारख्या वादळाचा  संसार माईनी शिक्षिकेची नोकरी करत आणि सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत समर्थपणे पेलला. आजही माई या साऱ्यात कमालीच्या तन्मयतेने व्यग्र असतात. आपल्या मुलांना अंगभूत गुणांवर पुढे जाण्याची दीक्षा या दांपत्याने दिली.आणि मुलेही स्वतःच्या पायावर व बुद्धिमत्तेवर पुढे गेली. 'सागर ' या राष्ट्रीय जलतरणपटू असलेल्या नातवाचा वयाच्या विशीत रक्ताच्या कर्करोगाने झालेल्या मृत्यूचे दुःख एन.डी. व माईनी पचवले. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवे जलतरणपटू घडावेत या हेतूने ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावाची कल्पना कृतीत आणली आणि तो कोल्हापुरात उभाही केला. कौटुंबिक सुखदुःखाच्या सर्व वाटचालीत माईंची खंबीर साथ आणि त्यांचा मोठा त्याग हे एन.डी.नावाच्या सामर्थ्यामागचे सामर्थ्य आहे यात शंका नाही.
                 १९४८ साली एन.डी.नी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यालाआता बहात्तर वर्षे झाली.एकषष्ठ वर्षांपूर्वी म्हणजे १९५९ साली दस्तुरखुद्द कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सरांना रयत शिक्षण संस्थेचे सदस्य करून घेतले होते. रयत शिक्षण संस्थेच्या एकशेवीस वर्षाच्या वाटचालीत एन.डी.नी वीस वर्षाच्या चेअरमनपदासह गेली सहा दशके अतुलनीय स्वरूपाचे योगदान दिले आहे. त्यामुळे नुकताच रयत शिक्षण संस्थेने  " रयत जीवन गौरव " हा पुरस्कार एन.डी.ना प्रदान केला. आशिया खंडातील मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात असा पुरस्कार प्रथमच दिला गेला आहे.यावरून एन.डी.सरांचे त्यातील योगदान अधोरेखित होते. समाजातल्या शेवटच्या माणसाच्या शिक्षणाचा विचार सरांनी केला आहे.आज पुनरप्रकाशित होणारे  "शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? 'हे पुस्तक म्हणजे शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक सर्वात प्रामाणिक अभ्यासू प्रयत्न आहे. गेल्यावर्षी विद्यमान केंद्र सरकारने 'नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण' आणले. त्याचाही एनडी सरांनी सखोल अभ्यास केला. ते म्हणतात ," नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणांमध्ये अभिजनांसाठी सर्वकाही दिले आहे. आणि बहुजनांना ठेंगा दाखवला आहे. कारण या धोरणात सामाजिक न्यायाचा विचार दिसत नाही. संपूर्ण भवितव्य छेदून  टाकणाऱ्या या धोरणात संशोधनावर ही सरकारी धोरणाचा संकुचित संशयात्मा स्वार झालेला आहे. उंच मनोऱ्याची सुरुवातही जमिनीपासून होत असते याचे भान धोरणकर्त्यांना दिसत नाही. कारण ते हवेत इमले बांधत आहेत.त्या विरोधात सर्व घटकांनी एकजुटीने लढा उभारला पाहिजे."  रयत शिक्षण संस्थेसह अनेक संस्थांना एन.डी.नी भक्कम पाठबळ दिले आहे.सर्वसामान्य माणसेच परिवर्तन घडवू शकतील यावर सरांचा गाढ विश्वास आहे. " विश्वासाने विश्वास वश करता येते "हे ध्यानात ठेवून एन.डी.सर कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास ठेवतात. छत्रपती शिवाजी महाराज, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी ,राजर्षी शाहू ,महात्मा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा आदिना प्रेरणास्थाने मानून एन.डी.सरांची वाटचाल आज वयाच्या ब्यांणाव्या वर्षीही त्यांचे विचार पुढे नेत निष्ठापूर्वक सुरू आहे.
                 एन.डी.सरांच्या आजवरच्या राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक अशा विविध स्वरूपाच्या कामांची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ (नांदेड ),डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर)  या तीन विद्यापीठांनी त्यांना " डि लीट " या सन्माननीय पदवीने गौरविले आहे. राजर्षी शाहू गौरव पुरस्कारापासून यशवंतराव चव्हाण पुरस्कारापर्यंत आणि महाराष्ट्र फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार पासून शाहीर पुंडलीक फरांदे पुरस्कारापर्यंत अनेक मानाचे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत.आज ब्यांणाव्या वर्षात पदार्पण करतानाही  त्यांचा उत्साह तरुणाला लाजवणारा आहे. त्यांचे नेतृत्व, मार्गदर्शन वर्षानुवर्षे मिळत राहणे ही महाराष्ट्राच्या प्रबोधन व परिवर्तन चळवळीची गरज आहे.रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेचा दाखला देत सर नेहमी म्हणतात, " या वनराजीतून बाहेर जाणारे दोन रस्ते होते ,त्यापैकी कमी मळलेला रस्ता मी निवडला.आज मी जो आहे तो त्याच वाटचालीतून घडलो आहे." पण खरे तर एन.डी.सर महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात , शिक्षणक्षेत्रात,सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचा वेगळा निर्माण रस्ता निर्माण करणारे आहेत. त्यांना भरभरून शुभेच्छा.जीवेत शरदः शतम्...
      
             ( लेखक प्रा.डॉ.एन.डी.पाटील अध्यक्ष असलेल्या समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी या संस्थेचे सरचिटणीस आहेत. तसेच प्रबोधिनीच्या वतीने गेली एकतीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या  " प्रबोधन प्रकाशन ज्योती " मासिकाचे संपादक आहेत.)
   /////////////////////////////////////////

Post a comment

0 Comments