पुणे : प्रस्ताव मंजूर मात्र निधीच नाही.

प्रस्ताव मंजूर, मात्र निधीच नाही : करोनामुुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्यथा
PRESS MEDIA LIVE :. पुणे :.  मोहम्मद जावेद मौला.


पुणे – करोना कालावधीत शहर स्वच्छता तसेच करोना नियंत्रणाचे काम करताना मृत्युमुखी पडलेल्या 13 मधील 11 कर्मचाऱ्यांना केंद्राने जाहीर केलेली 50 लाखांची मदत विमा कंपनीने नाकारली आहे. मात्र, त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना महापालिकेने घोषणा केलेली 50 लाख रुपयांची मदतही अद्याप मिळाली नाही. ती देण्यासाठी स्थायी समितीने मंजूरी दिली असली तरी हा प्रस्ताव मुख्यसभेच्या मंजुरीसाठी पडून आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पालिकेने घोषणा केलेली दमडीचीही मदत मिळाली नाही.

केंद्र शासनाने करोना नियंत्रणाचे काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याची घोषणा केली होती. त्यानंतर महापौरांनी पुढाकार घेत पालिका कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाल्यास त्याला केंद्राचे 50 लाख रुपये आणि पालिकेकडून 50 अथवा 25 लाखांची मदत आणि एका वारसाला नोकरीची घोषणा केली. त्यानुसार, स्थायी समितीत प्रस्तावही मंजूर करून या मदतीसाठी 25 कोटींचे वर्गीकरण केले.

मात्र, करोनामुळे मुख्यसभा न झाल्याने या प्रस्तावास अद्याप मुख्यसभेची मान्यता नाही. तसेच, हे वर्गीकरण कोणत्या पैशातून द्यायचे हेच अद्याप प्रशासनाने निश्‍चित केलेले नाही. त्यामुळे 13 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पालिकेकडून घोषणा करण्यात आलेल्या मदतीचीही 1 दमडीही मिळालेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसह कामगार संघटना आक्रमक असून तत्काळ मदत न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विमा कंपनीने नाकारली मदत
कर्मचाऱ्यांना मदत देण्यास विमा कंपनीने नकार दिला आहे. महापालिकेने राज्याच्या आरोग्य विभागाकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांनी थेट करोना रुग्णांच्या संपर्कात येऊन काम केले नसल्याचे सांगत ही मदत विमा कंपनीने नाकारली आहे. त्यामुळे शहराच्या आरोग्यासाठी माणूस गमावला मात्र ना केंद्राचा विमा मिळाला ना महापालिकेची मदत अशा भावना या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून व्यक्‍त होत आहे.

महापालिकेकडून घोषणा करण्यात आलेली मदत तातडीने देण्यात येईल. सध्या करोना नियंत्रणाच्या कामात ही मदत देण्याचे काम सुरू असून त्याबाबत प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुख्यसभेची वाट न पाहता ही मदत द्यावी अशा सूचना प्रशासनास केल्या आहेत.
– मुरलीधर मोहोळ, महापौर

Post a comment

0 Comments