मुंबई :


राजगृहाचा  अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

PRESS MEDIA LIVE :   मुंबई   :  (गणेश राऊळ ) :

मुंबई : राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथ खजिना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.  मंगळवारी (दि. ०७) सायंकाळी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान तथा आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान समजल्या जाणाऱ्या 'राजगृह' या वास्तू मध्ये अज्ञात माथेफिरूनी प्रवेश करत तेथील कुंड्या व सीसीटीव्ही कॅमेरे आदींची तोडफोड केली, या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून पोलीस संबंधितांचा कसून तपास घेत आहेत

घटना विकृत मानसिकतेतून - अजित पवार

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या 'राजगृह' निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे.राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये, शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेत, आपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे यांनीही व्यक्त केला निषेध

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, संबंधितांचा तातडीने शोध घेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. काल रात्री राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान 'राजगृह' ही आमची अस्मिता आहे, माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला असून, या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी या प्रकरणी लक्ष घालून या माथेफिरुना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.' असे मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील या प्रकरणी पोलीस तत्परतेने तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.

Post a comment

0 Comments