अहमदनगर :


शिवसेनेच्या चक्क पाच नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश.



PRESS MEDIA LIVE : अहमदनगर 

(कमलेश शेवाळे )

अहमदनगर – महाविकास आघाडीत सारं काही आलबेल  सुरू असल्याचं चित्र ठाकरे आणि पवार सांगत असले तरीही स्थानिक पातळीवर अनेक वाद आहेत. म्हणूनच आज चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला येत्या काही महिन्यांत नगरपंचायतीची निवडणूक होणार असल्याने आमदार लंके यांनी सुरू केलेली ही तयारी असल्याचे सांगण्यात येते. तालुक्याचे आमदार असले तरी शहरावरही वर्चस्व असले पाहिजे, हाच त्यांचा हेतू आहे. अशाच पद्धतीने जामखेडमध्येही तेथील नगरपालिकेची सत्ता ताब्यात घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना काही दिवसांपूर्वीच यश आले आहे. फरक एवढाच की जामखेडला भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. तर पारनेरला राज्यातील सत्तेत एकत्र नांदणाऱ्या शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत आले आहेत.

पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार आणि शरद पवार यांचे विश्वासू समजले जातात. शरद पवार लंकेच्या कामावर समाधानी असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळेच, राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेतील फोडाफोडी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मान्य केल्याचे सांगण्यात येते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर औटी पक्षाकडूनही दुर्लक्षितच राहिले आहेत. त्यामुळे पारनेरमधील या फोडाफोडीची शिवसेनेकडून दखल घेतली जाऊन राज्याच्या राजकारणावर काही परिणाम होण्याचीही शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच लंके यांनी ही संधी साधली आणि पुढील निवडणुकीत पारनेर शहरातील एकहाती वर्चस्वचा मार्ग मोकळा केल्याचे मानले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post