प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१२ समाजवादी प्रबोधिनीचा ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्षाचे औचित्य साधून " भारतीय राज्यघटना " या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले.चर्चासत्राचे अध्यक्षस्थान समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांनी भूषविले. पाच सत्रांमध्ये हे चर्चासत्र झाले. प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून या विषयाचे महत्त्व व प्रबोधिनीची ४८ वर्षाची वाटचाल आणि पुढील जबाबदारी स्पष्ट केली. शशांक बावचकर यांनी सर्व वक्त्यांचे ग्रंथ व पुष्प देऊन स्वागत केले. प्रारंभी पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना तसेच अपघाती निधन झालेल्या अवधूत संजय जाधव यांना स्तब्धता पाळुन आदरांजली वाहण्यात आली.
या एक दिवसीय चर्चासत्रात पहिल्या सत्रामध्ये ' भारतीय राज्यघटना इतिहास व स्वरूप 'या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. भालबा विभुते यांनी मांडणी केली अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील होते. दुसऱ्या सत्रामध्ये ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी 'भारतीय राज्यघटना व संसदीय लोकशाही ' या विषयाची मांडणी केली.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर होते.तिसऱ्या सत्रामध्ये ' भारतीय राज्यघटना व न्याय संस्था 'या विषयावर राज्यघटनेचे अभ्यासक प्रा. डॉ. शिवाजी पाटील (सातारा)यांनी मांडणी केली.तर चौथ्या सत्रामध्ये "भारतीय राज्यघटना व सध्याचे राजकारण " या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी मांडणी केली. पाचव्या व समारोपाच्या सत्रामध्ये प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी ' पहलगामचा दहशतवादी हल्ला, भारत-पाक संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण ' या विषयावर मांडणी केली.
या सर्वच वक्त्यांनी विषयाला न्याय देणारी अतिशय सखोल पद्धतीने मांडणी केली. त्यातून भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाचा पुन्हा एकदा जागर करण्यात आला. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९७७ पासून सर्व इझम बरोबरच भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान हा विषय प्रबोधनासाठी जाणीवपूर्वक घेतला. आणि तो राजकीय व सामाजिक जीवनाच्या पटलावर आणला व तो आज केंद्रस्थानी आला आहे. तसेच २०२४ चा दिवाळी अंक 'भारतीय राज्यघटना ' या विषयावर प्रकाशित केला होता. संविधानावरील एक परिपूर्ण अंक म्हणून त्याचे अनेकांनी कौतुक केले याचाही उल्लेख वक्त्यांनी केला.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सामाजिक आशयाच्या लेखनासाठीचा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख पुरस्कार प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा ज्येष्ठ नेते जयकुमार कोले यांच्या हस्ते शाल, ग्रंथ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक लोकशाही आघाडीचा ( टी डी एफ) राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार बी. एस.खामकर ( मुरगूड) यांना मिळाली बद्दल आणि प्राचार्य साताप्पा कांबळे ( गडहिंग्लज) यांना एशिया इंटरनॅशनल कल्चरल अकॅडमीची सामाजिक व जनजागृती कार्याबद्दल मानस डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल प्रा. डॉ.अशोक चौसाळकर यांच्या हस्ते शाल, ग्रंथ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या चर्चासत्रास समाजवादी प्रबोधिनीच्या इचलकरंजी, जयसिंगपूर ,गडहिंग्लज, मुरगुड बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, शिराळा इत्यादी विविध शाखांचे प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. अन्वर पटेल यांनी आभार मानले.
फोटो: डॉ.चौसाळकर यांना मसाप चा लोकहितवादी पुरस्कार मिळाल्याबद्दल जयकुमार कोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंचावर प्रसाद कुलकर्णी, प्रा. डॉ. भारती पाटील, प्रा. डॉ. भालबा विभुते, डॉ. दशरथ पारेकर व प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील
फोटो: भारतीय राज्यघटना या चर्चासत्रात बोलताना प्रा.डॉ.भालबा विभुते मंचावर प्रा. डॉ. भारती पाटील, प्रा . डॉ.अशोक चौसाळकर ,डॉ. दशरथ पारेकर ,प्राचार्य डॉ . टी.एस.पाटील, प्रसाद कुलकर्णी आणि प्राचार्य आनंद मेणसे