प्रेस मीडिया लाईव्ह :
निरंजन कोळी :
दत्तवाड हे दूधगंगा नदीवरील शेवटचे गाव आहे. यामुळे काळमावाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध गावात ठिक-ठिकाणी पाणी अडवल्यामुळे मुळातच फार कमी पाणी या गावापर्यंत पोहोचते. सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दत्तवाड-एकसंबा व दत्तवाड-मलिकवाड या बंधाऱ्यावर हे धरणातून आलेले पाणी अडवण्यासाठी भक्कम सुविधा उपलब्ध नाही. म्हणून आलेले पाणी पुढे तसेच कर्नाटकात जाऊन मिळते. सध्या शेतीसाठी पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागात उसाची भरणी करण्याची कामे सध्या जोरात सुरू आहेत. त्यामुळे महागडी लागवड टाकून भरणी केलेल्या शेताला लगेच पाणी सोडणे गरजेचे असतानाच नदीपात्रातील पाणी संपल्याने ऊस पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी शेताची नांगरट करून सोयाबीनच्या पेरणीसाठी आपली शेती तयार केले आहे. पण पाण्याअभावी ही पेरणी ही लांबण्याची शक्यता आहे..
कारदगा येथे कर्नाटकातील काही गावातील नागरिकांनी पाणी पुढे न सोडता बंधाऱ्याला बर्गे घातल्याने कारदगाच्या पुढे अनेक गावांना येणारे नदीचे पाणी थांबले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काही दिवसातच संपले आहे. तरी पाटबंधारे खात्यांनी उन्हाळ्यातील दोन-तीन महिन्यासाठी तरी वरचेवर धरणातील पाणी सोडावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दत्तवाड येथील दूधगंगा नदीवरील दत्तवाड एकसंबा व दत्तवाड मलिकवाड या बंधाऱ्यावरील जीर्ण झालेले बर्गे काढून लवकरात लवकर नवीन बर्गे बसवावेत व येथे पाणी आडवावे जेणेकरून सर्वांनाच नदीपात्रात आलेल्या पाण्याचा लाभ घेता येईल, अशीही मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे...