निवडणुका निर्भय, निपक्षपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्षतापूर्वक काम करावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार


प्रेस मीडिया लाईव्ह :

सोलापूर, दिनांक ५ (जिमाका):-भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम दिनांक 16 मार्च 2023 रोजी जाहीर केलेला आहे. यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होऊन दिनांक 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. तरी ही निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतापूर्वक काम करावे, असे आवाहन विभागीय महसूल आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

        


   नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित निवडणूक कामकाजाचा आढावा प्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय सह आयुक्त नगर प्रशासन पुनम मेहता, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिलधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी निवडणूक गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, पोलीस शहर उपयुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

      विभागीय आयुक्त डॉ  पूलकुंडवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व अधिकारी कर्मचारी यांनी ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परस्परात चांगला समन्वय ठेवावा. निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण अत्यंत काटेकोरपणे देऊन संबंधित नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी प्रशिक्षणाप्रमाणे कामकाज पार पाडावे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप चे कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवून मतदारांमध्ये जनजागृती करावी. सिंगल विंडो सिस्टीम मधून सर्व राजकीय पक्षांना आवश्यक असलेल्या परवानग्या त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधांची खात्री करावी. मतदान करताना एकाही मतदाराला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.

        जिल्ह्यात स्वीप अंतर्गत 18 ते 19 वयोगटातील मतदारांची मतदार म्हणून नोंदणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी येथील उद्योजक व्यावसायिक यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी देण्याबाबत सूचित करण्यात आलेले असून मतदान करणाऱ्या कामगारांचा उद्योजक बोटावरील शाही पाहून सत्कार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असलेला निवडणूक स्टाफ नियुक्त करण्यात आलेला असून त्यासाठी सर्व प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

       प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कामकाजाची माहिती दिली. हे निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 26 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून प्रत्येक नोडल अधिकाऱ्यावर विशेष जबाबदारी सोपवली असून त्यांचे कामकाज व्यवस्थितपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचारसंहिता कक्ष, स्वीप कार्यक्रम, सिंगल विंडो सिस्टीम, मीडिया कक्ष, जिल्हास्तरीय माध्यम व प्रमाणीकरण संनियंत्रण समिती, प्रशिक्षण व्यवस्थापन, साहित्य व्यवस्थापन पोस्टल बॅलेट आदींचे कामकाज व्यवस्थितपणे सुरू असल्याचे ही त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post