भारताच्या मालकीची किती बेटे आहेत, हे परराष्ट्र मंत्र्यांना माहिती आहे का ?

- काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांचा सवाल 

 अपयश झाकण्यासाठी भाजप नेते खोटा इतिहास‌ सांगत आहेत

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परदेशी नितिवर भाष्य करणारे देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना भारताच्या मालकीची किती बेटे आहेत, हे माहिती आहे का ? असा‌ सवाल काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांनी उपस्थित केला. गेली दहा वर्षात केंद्र सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला.




परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बालगंधर्व रंग मंदिरातील कार्यक्रमात शुक्रवारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परदेश नितीवर भाष्य केले. या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस भवन येथे उल्हास पवार यांनी पत्रकार परिषद घेवून जयशंकर व भाजपच्या कारभाराचा समाचार घेतला. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड उपस्थित होते. 

पवार म्हणाले, पंडीत नेहरूंनी 100 पेक्षा अधिक देशांशी संवाद ठेऊन समन्वय ठेवला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया अशा दोन गटात जग विभागले गेले होते. अशावेळी नेहरू यांनी या दोन्ही पासून अलिप्त असणाऱ्या देशांची मोट बांधली होती. परराष्ट्र सचिव राहिलेल्या जयशंकर यांना सर्व इतिहास माहिती असतानाही त्यांनी पुण्यात तरुण आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न  केला आहे. अमेरिकेने युनोचे पद देऊ केले पण नेहरूंनी स्वीकारलं नाही, असे जय शंकर  म्हणाले. मुळात युनोमध्ये सर्व देशांचे मत मिळाल्याशिवाय सदस्यत्व देता येत नाही. मग केवळ अमेरिका अथवा रशिया कसे सदस्यत्वाची ऑफर कशी देऊ शकतात? असा‌ सवालही पवार यांनी उपस्थित केला.

उलट 10 वर्षात नेपाळ, मालदीव यांसारखे देश आपल्या विरोधात गेले. श्रीलंकेलगतच्या बेटाचा विषय सत्तेतील 10 वर्षानंतर समोर आणला जातो. चीनने गिळंकृत केलेल्या  40 हजार चौ. की.मी.  जागेबाबत भाजप नेते अवाक्षर काढत नाहीत. भाजपची पायाखालची वाळू सरकली असल्याने ते दिशाभूल करीत आहेत. 

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून नेहरू यांची बदनामी करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. नेहरू आणि गांधी घराण्याची बदनामी केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही. गेल्या दहा वर्षात सरकारला आलेले अपयश लपवण्यासाठी खोटा इतिहास सांगितला जात आहे. अफवा पसरवण्यामध्ये आरएसएस सुरुवातीपासून आघाडीवर आहे. स्वातंत्र्य लढ्यात देश विरोधी भूमिका घेणारे आज स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर आरोप करून बदनामी करत आहेत.

निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने कुठल्याही स्तराला जाऊ नये, अशी विनंती आहे, असेही पवार म्हणाले.



Post a Comment

Previous Post Next Post