मोदी - शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला : डॉ. कुमार सप्तर्षी

- मोदी लाट ओसरल्याने लोकसभा त्रिशंकु येईल 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजकारणाचा व्यापार मांडला असून भाजपमधील ३० टक्के नेते इतर पक्षातून आयात केलेले आहेत. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. लोकसभेच्या १०२ जागांसाठी झालेल्या मतदानावरून मोदी यांची लाट ओसर्याचे लक्षात येते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप महायुतीला दोनशे ते सव्वा दोनशे जागा मिळतील, आणि त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात येईल, असे भाकीत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सप्तर्षी बोलत होते.डॉ. सप्तर्षी म्हणाले, कोणताही पक्ष ४०० पार म्हणतो, तेव्हा थडकी भरते. ऐवढी काय भाजपची‌ किमया आहे, की लोकांनी त्यांना चारशे पार जागा निवडून द्याव्यात. आरएसएसला हिंदु राष्ट्र आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्या‌ जिवावर भाजप ४०० पारचा नारा देत आहे. या निवडणुकीत मोदी शहांचा पाडाव होणे गरजेचे आहे. तरच देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षात राहिल. मोदी शहांचा पराभव झाला‌तरच भाजपही जिवंत राहणार आहे. पैसे खाल्लेल्या लोकांना धमकावून, जेलची भिती दाखवून भाजपसोबत घेतले जात आहे. अजित पवार व त्यांचे नऊ मंत्री हे भाजपसोबत जाणे, हे‌ त्याचेच उदाहरण आहे. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. मोदी-शहा ही व्यापारी जोडगोळी आहे. त्यांनी धाडी टाकून देणग्या घेतल्या. जनतेचा पैसा व्यापाऱ्यांनी वाटून घेतला. भाजपचे ३० टक्के लोक आयात केल्याने आयात आणि भाजपमधील हयात यांच्यात संघर्ष होणार आहे. 

मोदींनी निवडणुकीतले एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. बेकारी व महागाईचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. मोदींना अर्थव्यवस्थेचे अकलन आहे, असे वाटत नाही. नोट बंदीमुळे कसलाही काळा पैसा बाहेर आला नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर तुरुंगातील सगळ्यांना बाहेर सोडले, आचारसंहितेचा आदर केला. 

जरांगे पाटील‌ यांच्या मराठा आंदोलनामुळे भाजपची अडचण झाली आहे. मराठा मतदार नाराज झाल्याने राज्यात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे.  महाराष्ट्रात भाजपला अनुकुल वातावरण नाही.त्यामुळे यंदा‌ मागच्या वेळी पेक्षा कमी‌ जागा मिळणार आहेत. पुण्यात काँग्रेसचा मतदार आहे. पुण्याचा जो खासदार निवडून येतो, तेव्हा वर त्या पक्षाची सत्ता येते. कलमाडी जेव्हा काँग्रेसपासून दूर गेले, तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला. 

संविधान आहे तर आपण आहोत, अशी भावना दलित व मुस्लिमांची आहे, त्यामुळे ते आघाडीच्या मागे उभे राहतील. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वंचित व एमआयएमला मते मिळणार नाहीत. पुणे जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वासही डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केला. 



Post a Comment

Previous Post Next Post