मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 15 एप्रिलपासून महत्त्वाची सेवा होणार बंद



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून अनेकांचे दररोज लाखो रुपयांचं नुकसान होत आहे. ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.

15 एप्रिलपासून मोबाईल फोनवर एक मोठी सेवा बंद होणार आहे. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना यूएसएसडी कोड बेस्ड कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दूरसंचार विभागाच्या या आदेशामुळे, यूएसएसडी कोडद्वारे कॉल फॉरवर्डिंग सेवा 15 एप्रिल 2024 नंतर वापरता येणार नाही. दूरसंचार विभागाचं असं म्हणणं आहे की, ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये स्कॅमर यूएसएसडी बेस्ड कॉल फॉरवर्डिंग सेवेचा सर्वाधिक वापर करतात.

यूएसएसडी कोड म्हणजे काय आणि ते कसे कार्य करतात?

यूएसएसडी कोड हा एक शॉर्ट कोड किंवा फीचर आहे ज्याच्या मदतीने फक्त एक कोड डायल करून एका नंबरसाठी अनेक सेवा अॅक्टिव्ह आणि डी-ॲक्टिव्हेट केल्या जाऊ शकतात. पण, या कोडच्या फायद्यांसह काही तोटेदेखील आहेत. काही लोक दोन नंबर वापरतात. अशांना कॉल फॉरवर्डिंग सुविधेचा जास्त फायदा मिळतो. त्यांचा एक नंबर नेटवर्क एरियाच्या बाहेर असेल तर दुसऱ्या नंबरवर कॉल रिसीव्ह करता येईल, यासाठी ते यूएसएसडी कोड सुविधेचा वापर करतात.

जर ही सुविधा तुमच्या नंबरवर ॲक्टिव्ह असेल तर याचा अर्थ तुमच्या नंबरवर येणारे कॉल आणि एसएमएस दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड केले जात आहेत. स्कॅमर्स आपल्या फायद्यासाठी *401# या यूएसएसडी कोडद्वारे लोकांची ऑनलाइन फसवणूक करत आहेत. जर एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला कॉल करत असेल आणि *401# डायल करून अनोळखी नंबरवर कॉल करण्यास सांगत असेल, तर सावध झालं पाहिजे.

जर तुम्ही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून अनोळखी नंबरवर कॉल केला तर तुमच्या नंबरवर येणारे सर्व कॉल आणि एसएमएस त्या अनोळखी नंबरवर फॉरवर्ड होतील. परिणामी, तुमचं बँक अकाउंट, ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, सोशल मीडिया अकाउंटसाठी येणारे ओटीपी अनोळखी नंबरवर फॉरवर्ड होत राहतील. यातून तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं इतकेच नाही तर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचा ॲक्सेसही स्कॅमर्सकडे जाऊ शकतो.

कॉल फॉरवर्डिंग कसे बंद करावे?

तुम्हाला सुरक्षितपणे मोबाईल फोनचा वापर करायचा असेल तर तुमच्या नंबरसाठी कॉल फॉरवर्डिंग सेवा ताबडतोब बंद करा. यासाठी तुम्ही कस्टमर केअरची मदत घेऊ शकता. या शिवाय यूएसएसडी कोडच्या मदतीनेही कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद केली जाऊ शकते.

Post a Comment

Previous Post Next Post