ससून रुग्णालय नक्की कोणासाठी...?


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येणारे ससून हे रुग्णालय पुणे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय असून त्यात अनेक गोरगरीब नागरिक संपूर्ण जिल्ह्यातून उपचार घेण्यासाठी येत असतात. अशाप्रकारे लांबून येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या आप्त स्वकीयांशी काही वेळा मोबाईलवर संभाषण करावे लागते. परंतु अशा प्रकारे मोबाईलवर संभाषण करणाऱ्या नागरिकांना ससून रुग्णालयाच्या सुरक्षतेची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गचांडी पकडून धक्काबुक्की केली जात असल्याचे आज दिसून आले. 


ससून हॉस्पिटलमध्ये नियुक्तीस असलेल्या एका सुरक्षारक्षकाने हॉस्पिटलच्या परिसरात फोनवर बोलणाऱ्या नागरिकाला चक्क कॉलरला पकडून ओढत नेल्याचा प्रकार आज घडला असून या प्रकाराचा आम आदमी पक्षाच्या वतीने ससून प्रशासनाची भेट घेऊन तीव्र निषेध करण्यात आला. ससून हॉस्पिटलमध्ये एकीकडे मोठमोठ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सराईत गुन्हेगार तसेच ड्रग्स पेडलर्स ना अतिशय व्हीआयपी वागणूक दिली जाते ज्या वागणुकीचा फायदा घेऊन अनेकदा हे आरोपी हॉस्पिटलच्या परिसरातून पलायन करण्यातही यशस्वी झाले आहेत. परंतु दुसरीकडे उपचारासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षारक्षकांकडून केवळ त्रास दिला जात असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी ससून हॉस्पिटल हे नक्की कोणाच्या वापरासाठी आहे तसेच नागरिकांना इथे का त्रास दिला जात आहे याची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी आम आदमी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केली असून ते पुढे म्हणाले, गुन्हेगार व ड्रग्स पेडलर्स यांना शासकीय पातळीवर व्हीआयपी ट्रीटमेंट का दिले जाते ? सर्वसामान्य माणसाचा हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे अपमान का केला जातो? खरे तर हॉस्पिटल्स ही जनतेची काळजी आणि वैद्यकीय गरज पूर्ण करण्यासाठी उभारली जातात. एखाद्या व्यक्तीच्या घरातील एखादा सदस्य जर आजारी असेल तर ती व्यक्ती तसेही मानसिक दबावात असते त्यामुळे सुरक्षारक्षकांचे अशाप्रकारे रुग्णांच्या नातेवाईकांशी वागणे चुकीचे आहे. 

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज ससून हॉस्पिटलच्या प्रशासनाची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची चौकशी करावी तसेच सुरक्षारक्षकांना देण्यात आलेला गणवेश हा आपल्या भारतीय सैन्याच्या गणवेशाशी मिळता जुळता नसावा अशी मागणी ही सदर निवेदनात केली. दोशी सुरक्षारक्षकावर जर पुढील तीन दिवसात हॉस्पिटल प्रशासनाकडून कारवाई केली गेली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल अशी भूमिका यावेळी पक्षाच्या वतीने मांडण्यात आली.


सदर निवेदन देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष सय्यद अली, उमेश बागडे, संतोष काळे, संजय रणदीप, किरण कांबळे, कुमार धोंगडे, दत्तात्रय भांगे, अविनाश केंदळे, बालाजी कंटेकर, मनोज एरंडकर, संजय रनाधर, छाया भगत, चैत्राली भागवत इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post