शहरातील 7500 उन्नाड व भटक्या कुत्र्यांचे महापालिकेच्यावतीने निर्बीजीकरण

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

संभाजी चौगुले 

कोल्हापूर : उनाड व भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत पशु जन्म प्रतिबंध (उनाड व भटक्या कुत्री) हा कायदा आहे. या कायद्यानुसार उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिलेले आहेत. तसेच या कायद्यानुसार उनाड व भटक्या कुत्र्यांना मारणे अथवा इतरत्र नेऊन सोडणे यास पुर्णपणे मनाई आहे. या कायद्याप्रमाणे महानगरपालिकेचे उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याचे कामकाज सुरु आहे. यामध्ये महापालिकेच्यावतीने शहरातील 7500 पेक्षा जास्त उनाड व भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आजअखेर करण्यात आले आहे. कायद्यातील तरतूदीनुसार शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची शस्त्रक्रियेनंतर योग्य ती देखभाल व पोषण करुन शस्त्रक्रियेची जखम बरी झालेनंतर पकडलेल्या कुत्र्यांना त्यांच्या मुळ जागी सोडण्यात येते.


            कोल्हापूर महानगरपालिकेने जिल्हयात सर्वात प्रथम आयसोलेशन हॉस्पीटल नजीक स्वमालकीचे पहिले शस्त्रक्रिया केंद्र सुरु केले आहे. तदनंतर शस्त्रक्रियेचा वेग वाढविण्यासाठी मंगळवार पेठ येथे अधिक क्षमतेचे दुसरे निर्बीजीकरण केंद्र सुरु केलेले आहे. निर्बीजीकरणाच्या दैनंदिन कामकाजाकरीता तीन डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी पॅनेलवर घेण्यात आलेले आहे. या डॉक्टरांना यापुर्वी प्रति शस्त्रक्रियेसाठी रु.250/- इतके मानधन देण्यात येत होते. या मानधनामध्ये मागील महिन्यापासून वाढ करुन रु.400/- प्रति शस्त्रक्रिया डॉक्टरांना देण्यात येत आहे. तसेच आणखी डॉक्टर पॅनेलवर घेण्यासाठी जाहिरात देखील प्रसिध्द करण्यात आलेली आहे. शहरातील उनाड कुत्री पकडण्यासाठी 6 कर्मचारी नेमण्यात आले असून कुत्री पकडण्याची गती वाढविण्यासाठी आणखी 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या शहरात 12 कर्मचाऱ्यांच्यामार्फत कुत्री पकडणेची कारवाई सुरु आहे. महापालिकेमार्फत यासाठी विशेष मोहिम हाती घेऊन उनाड कुत्री पकडण्यासाठी अतिरिक्त 12 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उनाड व भटकी कुत्री पकडण्यासाठी सध्या एक वाहन उपलब्ध असून सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले आणखी एक वाहन खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे.


            आजपासून व्यापक गतीने उनाड कुत्री पकडण्यासाठी आणखी दोन वाहने भाडे तत्वावर उपलब्ध करुन घेतलेली आहेत. त्याचबरोबर उनाड व भटक्या कुत्र्यांची गणना करण्याचे काम वॉर्ड निहाय आरोग्य निरिक्षक यांच्यामार्फत सुरु करण्यात आलेले आहे. आजपर्यंत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 7,500 च्या वर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. दैनंदिन महापालिकेच्या निर्बीजीकरण केंद्रात 105 पिजंऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी आणखी 30 पिंजरे तयार करण्याचे काम सुरु आहे. यामुळे शस्त्रक्रियेचे काम अधिक जलदगतीने सुरु ठेवण्यात येणार आहे.


            कोल्हापूर महानगरपालिकेशी सलग्न ग्रामिण भागातील क्षेत्र आहे. त्यामुळे शहरालगतच्या ग्रामिण भागातील शस्त्रक्रिया न झालेली उनाड व भटकी कुत्री शहरामध्ये स्थलांतरीत होतात. हि कुत्री पकडण्याचीही कारवाई महापालिकेमार्फत सुरु आहे. याप्रमाणे शासनाच्या कायद्यानुसार महापालिकेमार्फत उनाड व भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरण यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही ठेवण्यात येत आहे. याबाबत सर्व नागरीकांनीही दक्षता घेणेबाबत आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) व सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडे रेबिस प्रतिबंधात्मक लस उपलब्ध आहे. सदर लसीचा डोस विहित वेळापत्रकानुसार (0, 3, 7, 14, 28) असा आहे. भटक्या कुत्र्यांबाबत नागरीकांना तक्रार करावयाची असल्यास कृपया सहा.आरोग्य निरिक्षक, कोल्हापूर महानगरपालिका (9561814474) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post