विदेशी मद्य वाहतुक व विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणाऱ्या नितीन वासुदेव विरुध्द स्थानबध्दतेची कारवाई


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : नितीन ज्ञानदेव वासुदेव, रा. वासुदेव गल्ली, भेंडवडे, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर हा इसम कोल्हापूर जिल्हा व नजिकच्या परिसरात अवैध गोवा बनावटीचे विदेशी मद्य वाहतुक व विक्रीचा बेकायदेशीर


व्यवसाय करतो. त्याचप्रमाणे तो कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, हातकणंगले तालुका व परिसरात तसेच कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी या कर्नाटक सीमावर्ती भागात व नजिकच्या परिसरातील लोकांना बेकायदेशीरपणे अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करत असतो. 

त्याच्या या बेकायदेशीर अवैध गोवा बनावटीचे विदेशी मद्य वाहतुक व विक्रीच्या कृत्यांमुळे शासनाच्या महसुलाची हानी होत असून त्या परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होवून धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, 1949 व इतर अधिनियमामध्ये विनिर्दिष्ठ केलेले गुन्हे सतत करीत असल्याने तो एमपीडीए कायद्याचे कलम 2 (ख) प्रमाणे ‘हातभट्टीवाला’ व्यक्ती बनल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस सर्वदूर बाधा पोहोचली आहे, त्यास प्रतिबंध म्हणून जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषय गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 अन्वये नितीन ज्ञानदेव वासुदेव यास स्थानबध्द करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.


नितीन ज्ञानदेव वासुदेव हा वाहतुक व विक्री करीत असलेल्या अवैध गोवा बनावटीच्या विदेशी मद्यामध्ये कोणत्याही घटकाचे निश्चित असे प्रमाण नसून ते मानवी आरोग्यास घातक व धोकादायक ठरणारे आहे. त्याच्या या बेकायदेशीर व गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलीस ठाणे शिवाजीनगर, इचलकरंजी, सावंतवाडी पोलीस ठाणे, जि.सिंधुदुर्ग तसेच निरीक्षक, कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क, हुक्केरी, संकेश्वर विभाग, कर्नाटक राज्य व राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाने त्याच्या अवैध गोवा बनावटीचे विदेशी मद्य वाहतुक व विक्री करत असताना वेळोवेळी छापे मारुन त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याने वाहतुक व विक्री केलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्यामुळे होणा-या परिणामांबाबतच्या अहवालात गोवा बनावटीचे विदेशी मद्य पिल्याने लोकांचे आरोग्य निश्चितच धोक्यात येऊ शकल्याबाबत नमूद केले आहे. हा इसम अशाच प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचा असून त्याचा हा मानवी जीवितास धोकादायक असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतुक व विक्रीचा व्यवसाय रोखण्यासाठी त्याच्या विरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, 1949 चे कलम 93 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क (मुंबई) विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूर जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रविंद्र आवळे व उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या स्थानबध्द आदेशानुसार नितीन ज्ञानदेव वासुदेव, रा. वासुदेव गल्ली, भेंडवडे, ता.हातकणंगले, जि. कोल्हापूर यांच्याविरुध्द स्थानबध्दतेच्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, शाहूवाडी विभागाचे तत्कालीन निरीक्षक- नंदकुमार देवणे, सध्याचे निरीक्षक किरण बिरादार, तत्कालीन दुय्यम निरीक्षक- विराज माने, अतुल पाटील, सध्याचे दुय्यम निरीक्षक - जी.बी.कर्चे, सुप्रिया गायकवाड, शंकर रणपिसे, जवान- सर्वश्री मनोज पोवार, संदीप जानकर, मोहन पाटील, कृष्णात पाटील, जय शिनगारे, मारुती पोवार, सचिन काळेल, बालाजी गिड्डे यांनी सहभाग घेतला. इसमास अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे किरण बिरादार, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शाहूवाडी यांनी सुपूर्द केले. 

स्थानबध्दतेची कारवाई ही राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर या विभागाची व पयार्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी कारवाई असून त्यामुळे संबंधित हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्या तसेच अवैध गोवा बनावटीचे मद्य वाहतुक व विक्री करणाऱ्या व्यक्तींमध्ये दहशत निर्माण झाली असून राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग यांच्या समन्वयाने यापुढेही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अवैध मद्य उत्पादन, विक्री व वाहतुक करणाऱ्या व्यक्ती विरुध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई सुरु राहणार असून विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘हातभट्टीमुक्त गाव’ संकल्पनेस तसेच अवैध गोवा मद्य वाहतुक व विक्रीस आळा घालण्यास पुष्टी मिळणार आहे. यापूर्वी विभागामार्फत हातभट्टी निर्मिती, विक्री व वाहतुक इ.बाबत हातभट्टी निर्मिती असणाऱ्या गावांमध्ये समुपदेशनानंतरही संबंधितांच्या वर्तनात बदल होत नसल्याने तसेच अवैध गोवा बनावटीचे मद्य वाहतुक व विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात एमपीडीए अंतर्गत कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती शाहूवाडी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किरण बिरादार यांनी दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post