मराठा महासंघा तर्फे पुढचं पाऊल पुस्तकाचे होणार वाटप

 मिरज प्रतिनिधी धनंजय हलकर

शिवजयंतीदिनी प्रकाशन, राजेंद्र कोंढरे यांची संकल्पना 

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या पुस्तिकेबाबत मिरजेत माहिती देताना डॉ. विकास पाटील, के. के. जाधव, नेताजी सूर्यवंशी, मितेश पवार, किशोरकुमार धनवडे, विजय शिंदे. 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मिरज / प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या आजचा निश्चय, पुढचं पाऊल या पुस्तिकेचे वाटप संघटनेतर्फे करण्यात येणार आहे. शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारी रोजी पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर या पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. समाजातील सुमारे ३ लाख व्यक्तींपर्यंत ही पुस्तिका पोहोचवण्याचा संघटनेचा संकल्प असल्याचेही सांगण्यात आले. 

मिरज येथे डॉ. विकास पाटील, ज्येष्ठ पत्रकार के. के. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख नेताजी सूर्यवंशी, सांगली जिल्हाध्यक्ष अभिजीत शिंदे, अखिल भारतीय मराठा समाज वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाध्यक्ष मितेश पवार, जिल्हा सरचिटणीस किशोरकुमार धनवडे, विजय शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ज्ञानाची आस, गुणवत्तेचा विकास, व्यवसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने आजचा निश्चय, पुढचं पाऊल ही ७४ पाणी पुस्तिका प्रसिद्ध होणार आहे. या पुस्तिकेचे कव्हर पेज यावेळी प्रसिद्ध करण्यात आले. मराठा समाजाला ज्ञानसंपत्ती, गुणात्मकतेची, व्यावसायिकतेची मोठी गरज आहे. त्यासाठी ही जनजागृती मोहीम आहे. या पुस्तिकेमध्ये ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील स्वीकारार्ह बदल, आरक्षण, विवाह सोहळे, कुटुंबसंस्था, जमिनीचे रेकॉर्ड कसे ठेवाल, प्रगतशेती, विधीसाक्षरता, अर्थसाक्षरता, नको नुसत्याच एमपीएससीच्या वाटा, स्मार्टफोन सोशल मीडियाचा वापर, विविध प्रकारचे शासकीय दाखले, केंद्र व राज्य सरकारच्या विविध महामंडळाच्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांसाठी शासकीय आणि खाजगी शिष्यवृत्तींची माहिती, प्रक्रिया उद्योग, वसंतिगृह, निर्वाहभत्ता आदींबाबत उपयुक्त माहिती या पुस्तिकेतून देण्यात येणार आहे. 

राज्यभरात मराठा महासंघाचे कार्यकर्ते प्रत्यक्ष कुटुंबांची भेट घेऊन पुस्तिका वितरित करणार आहेत. तीन लाख व्यक्तींपर्यंत समाज, संघटन व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक जागृतीसाठी हा उपक्रम आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये महासंघाचे सर्व पदाधिकारी, सभासद हे जनजागृतीसाठी घरोघरी संपर्क साधणार आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून क्यूआर कोडच्या द्वारे नामवंत व्यक्तींचा समाजासाठी संदेश समाज बांधवांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. 

चौकट

मान्यवरांचे संदेश..

या पुस्तिकेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉ. गिरीश जखोटिया, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम, ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन संस्थेचे बाबा भांड, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, सह्याद्री फार्म नाशिकचे अध्यक्ष विलास शिंदे, मगरपट्टा सिटी पुणे चेअरमन सतीश मगर, ग्लोबल कोकण स्वराज्य भूमी अभियानाचे अध्यक्ष संजय यादवराव, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, संवाद कौशल्य वक्तृत्व कला प्रशिक्षक शशांक मोहिते इत्यादी मान्यवरांचे संदेश या पुस्तिकेच्या मुखपृष्ठावरून देण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post