आत्महत्या नसून गणेश जाधवचा खून

 नेरळ ग्रा.पं विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा मनसे आक्रमक.

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

कर्जत : - नेरळ ग्रामपंचायत आरोग्य विभागातील कर्मचारी गणेश जाधव याने शनिवारी सम्राटनगर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. ग्रामपंचायतीने गेले ९ महिने त्याचा पगार न दिल्याने आर्थिक विवंचनेतून गणेश जाधव यांनी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला जात आहे. 

तर या प्रकरणावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे. तसेच मनसेच्या भूमिकेला आजाद समाज पार्टी, व शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान गणेश जाधव याने आत्महत्या केली नसून नेरळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभाराने त्याचा खून केला असल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

            नेरळ ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांचा पगार नियमित केला जात नाही. गेले अनेक वर्षांची हि समस्या असून कर्मचारी देखील ग्रामपंचायतीकडे दाद मागून थकले आहेत. दरवेळी पगार शिल्लक राहून कधी एक कधी दोन अशी पगार होत असल्याने आता पर्यंत किमान ९ पगार थकली आहेत. तर बँकेचे कर्ज, बचतगट, पतपेढी यांचे कर्ज, मुलांच्या शाळेची फी, घरखर्च आदी खर्च भागवताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. कधीकाळी तर सणाला सुखाचा घास मिळणे देखील मुश्किल अशी स्थिती नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर ओढवली आहे. अशात याच आर्थिक संकटाना तोंड देताना घरातील आर्थिक वादावरून गणेश जाधव याने शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत अडचणीत आली आहे. तर यावरून आता मनसेने नेरळ ग्रामपंचायतीविरोधात दंड थोपटले आहेत. 

आज दिनांक १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आजाद समाज पार्टी व शिवसेना ठाकरे गटाने नेरळ पोलीस ठाण्यात धडक देत नेरळ ग्रामपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच गणेश जाधव यांच्या घरात कुणी कर्ता पुरुष नसल्याने त्याच्या पत्नीला सेवेत सामावून घेत त्यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत करण्याची मागणी केली. यावर नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपण याबाबत गुन्हा दाखल केला असून योग्य तो तपास करून वरिष्ठांच्या मार्गदर्शानुसार कारवाई करणार असल्याचे सांगितले. तर आंदोलनकर्त्यांनी यानंतर नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली असताना मात्र नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात मनसे, आजाद समाज पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धडक दिली असताना त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक आदी कुणीही उपलब्ध नव्हते. तर त्यांचे फोनही लागत नसल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील त्यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालत निषेध नोंदवण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीने मयत गाणेश जाधव यांच्या कुटूंबाला  मदत न केल्यास नेरळ  ग्रामपंचायतीला टाळे ठोकू अशी भूमिका जाहीर केली आहे.  

यावेळी मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुकाध्यक्ष महेंद्र निगुडकर, पर्यावरण सेना जिलाध्यक्ष अभिजित घरत, दहिवली ग्रामपंचायत सदस्य यशवंत भवारे, तालुका सचिव समीर चव्हाण, आजाद समाज पार्टीचे उपाध्यक्ष ऍड. सुमित साबळे, अल्ताफ जळगावकर, बाळा संदानशीव, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख हेमंत क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते. तर मयत गणेश जाधव हे आमच्या परिसरात राहायचे त्यांना ३ वर्षांची ४ वर्षांचा मुलगा आहे. ग्रामपंचायत मध्ये कामाला असलेल्या गणेशकडे गेले अनेक महिने पगारच मिळाला नसल्याने घरात खायला काही नव्हते तर मुलगी आजारी असल्याने डॉक्टरांनी तिला हवेखाली झोपायला सांगितले मात्र  घरात पंखा नाही आणि नवीन पंखा विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते. घरी कुणी कमावते नाही. अशात घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. ग्रामपंचायतीमुळे गणेशचा जीव गेला तेव्हा मनसे, शिवसेना सोबत आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत. आणि त्याला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरु राहणार असे आजाद समाज पार्टी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ऍड.सुमित साबळे यांच्या कडून सांगण्यात आले.

 नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी याना वर्ष वर्ष भर पगार दिले जात नाही. यासाठी आम्ही याअगोदर देखील लढलो आहे. तर गणेश जाधव याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असली तरी त्याचा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ प्रशासनाने खून केला आहे. ठेकेदारांची बिल द्यायला पैसे आहेत. मग कचरा उचलणाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांसाठी पैसे नाहीत का ? जर ग्रामपंचायतीमध्ये पैसेच नाहीत तर ग्रामपंचायत चालवताच कशाला ? ती बंद करून टाका नाहीतर ती आम्हीच टाळे ठोकून बंद करू असे मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले यांच्या कडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post