महात्मा फुले यांनी शुद्ध मानवतेचा विचार करून सामाजिक कार्य प्रभावीपणे केले - प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

नेसरी ता.२९ ,महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन वंश ,धर्म, देश ,भाषा निरपेक्ष असा शुद्ध मानवतेचा विचार करून प्रभावीपणे सामाजिक कार्य केले. त्यामुळे महात्मा फुले हे समकालीनांपेक्षा अधिक प्रभावी आणि गुणात्मक दृष्ट्या व्यापक उंचीचे ठरले .त्यांचा बुद्धीप्रमाण्यवादी विचार आणि त्यांनी आपल्या लेखनातून व कृती  कार्यातून दिलेल्या प्रेरणा आजही आपल्याला स्फूर्तीदायक,मार्गदर्शक आणि अनुकरणीय ठरतात यातच महात्मा फुले यांचे सार्वकालिक महानपण अधोरेखित होते. 

महात्मा फुले यांचे विचार आपण ज्या क्षेत्रात कार्यरत असू त्या क्षेत्रात अंगीकारणे हीच फुले यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस आणि प्रबोधन प्रकाशन ज्योती मासिकाचे संपादक प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) आणि तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय ( नेसरी )यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत' महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य ' या विषयावर बोलत होते. महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त ही व्याख्यानमाला शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित केली जाते.



या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण समिती नेसरीचे अध्यक्ष ऍड .हेमंत कोलेकर होते.शिक्षण समितीच्या सचिव व शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ.अर्चना कोलेकर आणि प्राचार्य ए.डी. लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस.बी.भांबर यांनी केले. इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.एस. कोळसेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आधी सामाजिक की आधी राजकीय या वादात न अडकता  समग्र परिवर्तनाचे समाजकारण केले.त्यामुळे राजकारण, समाजकारण,धर्म,शिक्षण, शेती, साहित्य अशा विविध क्षेत्रात त्यांनी मूलभूत स्वरूपाचे आणि सार्वकालीक उपयुक्त ठरणारे मौलिक काम केले. सामाजिक परिवर्तनावर त्यांचा आढळ विश्वास होता. त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म आणि सत्यशोधक समाज हा व्यक्तिगत नव्हे तर सामाजिकतेला प्राधान्य देणारा आहे. त्यांचे लेखन आणि त्यांचा सामाजिक विचार हीच त्यांच्या जीवनकार्याच्या सिद्धतेची व्याख्या होती. छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडीभूषण असे संबोधून महात्मा फुले यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला .तसेच दस्यू पोवाडा लिहिला आणि दलित,आदिवासी गुलाम यांना नायकपण दिले. डयुक ऑफ कॅनॉटच्या सत्कार समारंभात ते जाणीवपूर्वक गरीब शेतकऱ्याचा वेष करून गेले.तसेच त्यांनी ग्रंथकार सभेला पत्र लिहून साहित्य आणि समाज याबाबतीत विश्लेषणही केले. समाजाच्या सर्व क्षेत्रात ऊक्ती आणि कृतीने काम करणारा एक महामानव म्हणून महात्मा फुले यांच्याकडे बघावे लागेल. म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन हजार वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करून गौतम बुद्ध , संत कबीर आणि महात्मा फुले या तिघांना आपले गुरु मानले होते. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा अनेक उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण उहापोह  केला. तसेच तीच विचारधारा घेऊन या संस्थेचे संस्थापक माजी आमदार कालवश तुकाराम कोलेकर हे कार्यरत राहिले हेही स्पष्ट केले आणि त्यांच्याबरोबरचा ऋणानुबंधही व्यक्त केला.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना ऍड.हेमंत कोलेकर म्हणाले, महात्मा फुले यांचे विचार पथदर्शी आणि क्रांतीदर्शी आहेत. त्यांनी ज्या पद्धतीचे रचनात्मक सामाजिक कार्य केले ते आज दीडशे वर्षानंतरही आपल्याला प्रेरणा देणारे आहे. तोच विचार घेऊन पुढे जाणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे.कोळेकर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य ए.डी.लोहार ,प्रा.शिवाजीराव होडगे ,प्रा.अनिल उंदरे, प्राचार्य साताप्पा कांबळे ,प्रा. अप्पासाहेब कमलाकर, प्रा. गणपतराव पाटोळे ,डॉ. राजेंद्र गुंडे, सुरेश पवार ,वसंत पाटील, प्रा. एस. एस.मटकर, प्रा. डॉ.महेंद्र चव्हाण, प्रा. डॉ.विजय मुसाई, ईश्वर दावणे,एस.एन. राजगोळकर आदींसह महाविद्यालयातील सर्व अध्यापक अध्यापिका आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एम. के. चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .डॉ.एच. एस.कुचेकर ,प्रा. विजया पाटील व प्रा. संगीता लोखंडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post