आचार्य अत्रे विसाव्या शतकातील एक अजोड अष्टपैलू व्यक्तिमत्त्व -प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

कुरुंदवाड ता.३० जीवनाची जी चिरंतर मूल्ये आज मानवजातीच्या प्रगतीपथावर ध्रुवताऱ्याप्रमाणे आढळ तेजाने तळपत आहेत,ती मूल्ये आणि सत्य मानव जातीला साहित्याने दिलेली लेणी आहेत.असे म्हणत साहित्य हे सहावे महाभूत आहे असे मानणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व विसाव्या शतकात मराठी विश्वामध्ये झाले नाही. 

नाटककार, विडंबनकार ,चित्रपटकार, वृत्तपत्रकार ,शिक्षणतज्ञ ,वादविवादपटू, विनोदकार ,प्रभावी वक्ता, सव्यसाची लेखक , संपादक,राजनीतिज्ञ ,सामाजिक भान असलेला कार्यकर्ता-नेता अशी विविधअंगी ओळख आणि प्रत्येक क्षेत्रातील भव्य कामगिरी अन्य कुठल्याही एका व्यक्तीला जमली नाही. यातच आचार्य अत्रे यांची महानता दिसून येते. असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या नगर वाचनालय ( कुरुंदवाड )यांच्या पद्मश्री पां.वा.गाडगिळ व डॉ. स . रा.गाडगिळ स्मृती शरदव्याख्यानमालेत समारोपाचे पुष्प गुंफताना 'आचार्य अत्रे यांचे १२५  वे जन्मवर्ष 'या विषयावर बोलत होते. वाचनालयाचे कार्याध्यक्ष अ.शा.दानवाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विनयाताई घोरपडे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माणिक दातार यांनी व्याख्यानमालेचा अहवाल सादर केला.


प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, आचार्य अत्रे यांच्या लेखनात व भाषणात हजरजबाबी खळाळता विनोद होता, ताजेपणा होता, शिवराळपणा होता थोडी अतिशयोक्ति पण होतीआणि  एक आक्रमक, धाडसी,  बेदरकार अव्वल कलावंत होता. बंदुकीने युध्ये होत असली तरी ती लेखणीने निस्तारावी लागतात असे ते म्हणत.भाषण स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य हा नागरी स्वातंत्र्याचा पाया आहे.ते मिळवण्यासाठी लेखकाने आपले सर्वस्व पणाला लावले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आचार्य अत्रे यांनी सामाजिक दांभिकतेवर नेमकेपणाने प्रहार केला. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामध्ये आचार्य अत्रे यांच्या साहित्य ,शिक्षण, राजकारण, समाजकारण, साम्राज्यवाद, स्वातंत्र्य पारतंत्र्य ,भाषा, कला,वाचन ,पत्रकारिता आदी विविध विषयांवरील भूमिकांचा व मतांचा सविस्तर आढावा घेतला आणि त्याची आजच्या संदर्भात गरज अधोरेखित केली. प्रा. बी.डी. सावगावे यांनी आभार मानले. नगर वाचनालयाच्या डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात झालेल्या व्याख्यानास डॉ. दिलीप कुलकर्णी, के. एस. दानवाडे, द.बा. भोसले यांच्यासह रसिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post