पंचायतन मंदिरात इर्शाळवाडी बांधवांच्या हस्ते महाआरती




प्रेस मीडिया लाईव्ह 
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

 पनवेल : संपूर्ण रायगड, नवी मुंबई परिसरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यामध्ये खालापूर येथील जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामध्ये नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. खालापूर परिसरातील  इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तेथील बांधव काही दिवस श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरात वास्तव्यास होते. त्या दरम्यान  त्यांच्यासोबत जे एम म्हात्रे कुटुंबीयांचा एक जिव्हाळा निर्माण झाला आहे . 
      
   दुर्घटनेनंतर आता काही महिन्यानंतर सर्वांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गणपती मध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आरतीचा मान घेऊन लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन इर्शाळवाडी  बांधवांनी गणेशोत्सव साजरा केला. नवरात्रीमध्ये एक दिवस श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामधील देवीच्या आरतीचा मान तेथील या बांधवांना देण्यात आला. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रितम म्हात्रे यांनी सांगितले की  "नवरात्रीमध्ये एक दिवस आमच्या देवीच्या आरतीचा मान आपल्या या बांधवांना द्यावा अशी माझ्यासह माझ्या संपूर्ण कुटुंबीयांची इच्छा होती त्या निमित्ताने सर्व इर्शाळवाडीतील माझ्या बांधवांना सन्मानाने निमंत्रित करून माझी आई आणि  कुटुंबीयांच्या उपस्थितीत मंदिरात महाआरती चे आयोजन आम्ही केले होते. यावेळी त्यांच्यासाठी पंचायतन सभागृहात पारंपारिक आदिवासी नृत्याचे आयोजन  करण्यात आले होते. आज आभाळा एवढ्या दुःखातून ते सावरत आहेत हे पाहून मनाला थोडेसे समाधान वाटले. त्यांच्या भविष्यातील यशस्वी जीवनासाठी देवी त्यांना बळ देवो हीच इच्छा त्यांनी व्यक्त केली"
        यावेळी दर्शनासाठी उपस्थित असलेल्या भाविकांनी सुद्धा बांधवांसोबत देवीचा आशीर्वाद घेऊन मनोभावे महाआरती केली.

Post a Comment

Previous Post Next Post