भगवत गीता सांगण्याचे वय झाले, रास लीला कसल्या करताय..




प्रेस मीडिया लाईव्ह : 


इचलकंरजीच्या सर्व जनतेला नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा. सोमवार दि. १६/१०/२०२३ इ. रोजी आमदार प्रकाशराव आवाडे यांनी इचलकरंजीमध्ये जाहीर सभा घेतली, जाहीर सभा घेवून इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेसंदर्भात आपली भुमिका मांडली व ती योजना ही मीच करणार अशी भिष्म प्रतिज्ञा केली. वरील सभेनंतर काही मित्रांनी फोन करुन आपण आपले राजकीय आकलनाप्रमाणे त्याचे वरील सभेचे राजकीय विश्लेषण करावे म्हणून हा विषय इचलकरंजीच्या जनतेला राजकारण समजावे म्हणून मी हा लेख लिहीत आहे.

आमदार साहेब भगवतगीता सांगण्याचे वय झाले, अजूनही वयाच्या पंच्यातरी समोर असताना रासलिला चालू आहेत.

इचलकरंजीत जाहीर सभा घेतली व आपली भुमिका मांडली, ही निव्वळ तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी चाललेली धडपड आहे हा फक्त आणि फक्त तुमचा राजकीय त्रागा आहे. २०१९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणूकीत तुम्ही कॉंग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हयाचे अध्यक्ष होता, असे असताना पक्षाने तुम्हाला काढून टाकले नव्हते, परंतु स्वतःच्या वैयक्तिक महत्वकांक्षापोटी व तुम्हाला काय संपूर्ण महाराष्ट्राला माहित होते भाजप व शिवसेना यांचे सरकार येणार व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार व स्वतःला मंत्री होता यावे म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, ज्या इचलकरंजी काँगेस पक्षाने ५० वर्षात सहकारी संस्थेचे जाळे निर्माण केले, मग त्यात वेगवेगळया स्पिनिंग मिल, साखर कारखाने, कापड प्रोसेसिंग युनिट, शैक्षणिक संस्था, सहकारी बँका या गिळकृत करण्याच्या हेतूने व आपल्या घरातील लोकांना प्रत्येक संस्थेच्या गल्ल्यावर बसविण्यासाठी स्वतःचा खाजगी पक्ष म्हणजेच ताराराणी स्थानिक पक्ष काढला व २०१९ ची आमदारकीची निवडणूक लढविला. २०१९ च्या निवडणूकीत मी स्वतः एक गावाचा सेवक हितचिंतक म्हणून प्रमुख प्रचारक म्हणून तुमच्या निवडणुकीत प्रचार केला. यंत्रमाग धारकांनी आपल्या वेगवेगळया मागण्यांसाठी प्रातांधिकारी यांचे समोर चावी फेक आंदोलन केले होते. त्या एका चावीने तुम्हाला तुमचा दहा वर्षाचा राजकीय वनवास संपवून इचलकरंजीच्या जनतेने ५० हजार अशा प्रचंड मतांनी तुम्हाला निवडून दिले व तुम्हाला आमदार केले. २०१९ च्या निवडणूकीत एकही जंगी जाहीर सभा घेतली नाही, सुरवातीपासून तुम्ही आणि मी रोज सकाळी मतदार संघातील वेगवेगळया ठिकाणी 'चाय पे चर्चा' व कॉर्नर सभा घेवून जो तुमच्यावर जनतेने प्रचंड विश्वास दाखविला व वरील पध्दतीच्या प्रचाराचा जनतेने स्विकार केला. 

परंतु तुम्ही निवडूण आल्यानंतर दोनच दिवसात जनतेचे, कार्यकर्त्यांचे आभार न मानता त्यांना विश्वासात न घेता, स्वतःच्या वासराला घेवून मुंबई मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी तुम्हाला मंत्री होण्याची फार गडबड झाली होती. म्हणूनच फडणवीस यांना पाठिंबा दिला. पुढे जे मुख्यमंत्री फडणसीस व्हायचे त्या ठिकाणी नवीन महाविकास आघाडी निर्माण होवून उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर गेल्या ४ वर्षामध्ये इचलकरंजीच्या जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांना त्यांच्या हाल अपेष्टावर सोडून आठवडयातून चार दिवस तुमच्या जुन्या पध्दतीनुसार आपल्या वासरुला घेवून मुंबईत देवेंद्र फडणवीस यांना भेटने आणि दोन दिवस नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना भेटने, याशिवाय कोणताही वेगळा कार्यक्रम केला नाही किंवा इचलकरंजीच्या विकासासाठी काहीही न करता तोंडावर येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यासाठी भाजपच्या हायकमांडचे आपल्याकडे लक्ष जावे म्हणून घेतलेली ही सभा होती यात तिळमात्र शंका नाही. गेल्या ४ वर्षापासून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आवाडे प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यात त्यांना यश आलेले नाही. समोर लोकसभेच्या निवडणूकीसाठी आपल्या मुलांना खासदारकीचे टिकीट मिळावे म्हणून गेली ४ वर्षे चाललेले प्रयत्न निष्फळ होत आहेत. परंतु आता अवस्था अशी झालेली आहे की, विधानसभेसाठी तर आपल्याला भाजपचे टिकीट मिळणार किंवा भाजपचा पाठींबा मिळणार की नाही या शंकेने आपण आमदार अस्वस्थ आहात. कारण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तुमचे वय ७५ वर्षे होणार आहे हे भाजपला चालत नाही. तसेच भाजपच्या केंद्रीय नेत्याची प्रचारातील प्रमुख मुद्दयानुसार देशाला राजकारणातून परिवारवाद व व्यक्ती वादाच्या चक्रव्युवातून बाहेर काढायचे आहे. तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात २००९ ते २०१४ पर्यंत माजी आमदार व भाजपचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे अस्तित्व २००९ पुर्वी शुन्य असताना आज इचलकरंजी मतदार संघात प्रमुख एक नंबर पक्ष म्हणून उभा आहे. 

आजरोजी इचलकरंजी मतदार संघामध्ये एकूण ५ पक्ष आहेत. त्यामध्ये प्रमुख पक्ष म्हणून काँग्रेस होता, तो फुटल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याने तसेच शिवसेना पक्ष फुटल्याने वरील सर्व पक्षांचे अस्तित्व नगन्य झाले आहे. म्हणूनच ताराराणी पक्षाचे आमदार आवाडे यांची भाजपला साद घातलेली आहे. म्हणून इचलकरंजीची सुळकूड पाणी योजना निमित्त करुन भाजपच्या हायकमांडला आपली तथाकथीत ताकत दाखविण्यासाठी घेतलेली सभा आहे. माझ्या राजकीय आकलनाप्रमाणे इचलकरंजी विधानसभा मतदार संघात आजची परिस्थीती पहाता भाजप हा एक नंबरचा पक्ष आहे. महाविकास आघाडी हा दोन नंबरचा पक्ष आहे व तीन नंबर हा ताराराणी आघाडी हा स्थानिक पक्ष आहे. वरील पक्षांचा, इचलकरंजी विधानसभेमध्ये मतांची आकडेवारी लॉजिकली बघितली तर मतदारसंघामध्ये दोन सव्वादोन लाख मतदान होते यामध्ये भाजप, अजित पवार राष्ट्रवादी गट व एकनाथ शिंदे शिवसेना गट यांची मतांची टक्केवारी भाजप ४० ते ४५ टक्के, अजित पवार राष्ट्रवादी गट व एकनाथ शिंदे शिवसेना गट मिळून १० टक्के, महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस व उध्दव ठाकरे शिवसेना गट यांची २० ते २५ टक्के व ताराराणी आघाडी २० ते २५ टक्के अशी विभागणी माझ्या राजकीय आकलनाप्रमाणे दिसून येते.
म्हणूनच दोन दिवसापूर्वी ताराराणी आघाडी आमदार आवाडे यांना वरील सभा घेवून आपल्या राजकीय अस्तित्वासाठी चाललेला त्रागा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आपले विश्वासू

(श्री. . राजाराम शंकरराव धारवट ) माजी नगराध्यक्ष, इनपा.

1 Comments

  1. ताराराणी पक्ष आमदार झाल्यावर काँग्रेस कमिटी मध्ये विसर्जित केलं असं बोलले होते पण केलं नाही आणि काँग्रेस मध्ये असताना जेवढं मिळवले ते सगळं गमावलं...

    ReplyDelete
Previous Post Next Post