श्री दत्त भांडारच्या सभासदांना 12 टक्के लाभांश

ग्राहक आणि सभासद यांचा संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा: गणपतराव पाटील




प्रेस मीडिया लाईव्ह : 

शिरोळ /प्रतिनिधी:

     श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था अर्थात दत्त भांडार ग्राहकांची विश्वासार्हता आणि ग्राहकांना सुविधा देण्यामध्ये अग्रभागी राहिके असून या संस्थेची प्रगती चांगल्या पद्धतीने होत आहे. ग्राहक आणि सभासद यांचा या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असून यावर्षी 12 टक्के लाभांश देत आहोत. आगामी काळातही अत्याधुनिक सोयी सुविधा ग्राहकांना देण्यास आपण सातत्याने प्रयत्न करीत राहू, असे प्रतिपादन श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

  


  श्री दत्त कारखाना सभागृहात आयोजित श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेच्या 41 व्या वार्षिक साधारण सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी सर्व सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.

      संस्थेचे चेअरमन दामोदर सुतार यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या वर्षभरामधील कार्याचा आढावा घेतला तसेच बाजारपेठेमध्ये तीव्रतेने वाढत असलेले बाजारभाव, वाढती स्पर्धा आणि सहकारी संस्था असल्याने शासन निर्बंधांचे पालन करीत संस्थेने आपली प्रागतिक वाटचाल सुरू ठेवल्याचे सांगितले. तसेच 2022 - 2023 मध्ये संस्थेस 117.11 लाख व्यापारी नफा मिळाला असून नियमाप्रमाणे सर्व तरतुदी करून दोन लाख 78 हजार 208.13 इतका निव्वळ नफा झाला असल्याचेही स्पष्ट केले.  दत्त कारखान्याच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे, दरगू गावडे, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, शरद गोधडे, अंबादास नानिवडेकर, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष  दगडू माने या सर्वांनी संस्थेच्या प्रगती संदर्भात मनोगत व्यक्त करून संस्थेला आणखी उर्जितावस्था आणण्यासाठी सभासद व ग्राहकांनी दत्त भांडार मधून जास्तीत जास्त खरेदी करण्याचे आवाहन केले.

     प्रारंभी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. सर्वांचे स्वागत चेअरमन दामोदर सुतार यांनी केले. विषय पत्रिकेचे वाचन व सभा कामकाज जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे यांनी पार पाडले. यशस्वी चंद्रयान मोहिमेबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अभिनंदनाचा ठराव  करण्यात आला. त्याच बरोबर गणपतराव पाटील यांना 'समाज भूषण' व 'जीवनगौरव' पुरस्कार तसेच क्षारपड मुक्तीच्या 'दत्त पॅटर्न' ला पेटंट मिळाल्याबद्दल गणपतराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

      प्रारंभी एस. ए. घोरपडे यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार दत्त भांडारच्या संचालिका डॉ. सौ. राजश्री पाटील यांनी मानले. यावेळी व्हाईस चेअरमन सौ. अनिता कोळेकर, संस्थेचे सर्व संचालक, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन साताप्पा बागडी, जयसिंगपूर उदगाव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील, दत्त कारखाना सेवक पतसंस्थेचे चेअरमन सुधाकर शहापुरे, दिलीप पाटील कोथळीकर, राजू कोळेकर, याचबरोबर विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी, सभासद, सुहास मडिवाळ, दीपक ढोणे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post