गुट्टें विरुध्दच्या मोर्चाने गंगाखेड दणाणले.

 खासदार संजय जाधव यांचा गुट्टेंवर हल्लाबोल राजीनाम्याची मागणी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

डॉ.शिवाजी शिंदे : परभणी.

गंगाखेड:दि.11   गंगाखेड  शुगर्स एनर्जी प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो शेतकर्‍यांच्या नावाने कर्ज उचलणार्‍या आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील घाणेरडे राजकारण व फसवणूकीचे प्रकार तातडीने थांबवावे व फसवणूकीबद्दल राजीनामा द्यावा. अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सोमवारी (दि.11) गंगाखेडात आयोजित केलेल्या मोर्चाच्या समारोपीय भाषणातून केली.

परभणी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीचे अनुदान व पीकविमा मंजूर करावा, शेतकर्यांना किमान आठ तास सुरळीत वीज पुरवठा करावा तसेच वीज कनेक्शन तोडू नये व गंगाखेड शुगर्स एनर्जी प्रकल्पातील घोटाळ्या प्रकरणातील बाधित शेतकर्‍यांचे पैसे त्वरीत वितरीत करावेत. या मागणीसाठी शिवेसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.11) सकाळी  गंगाखेडात शिवसेनेचा मोठा मोर्चा काढण्यात आला. बालाजी मंदिर, जूने मराठा मंदिर, भगवती चौक, श्रीराम चौक, अदालत रोड व उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. त्या ठिकाणी तालुका प्रशासनास शिवसेनेच्या शिष्टमंडळाद्वारे मागण्यांचे निवेदन सादर केले. त्याद्वारे, गुट्टेंविरोधात कठोर कारवाईसह अन्य मागण्या करण्यात आल्या.

तत्पूर्वी मोर्चेकर्‍यांनी संपूर्ण बाजारपेठेत गुट्टें विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मोर्चाच्या समारोपा प्रसंगी खासदार जाधव यांनी जाहीर सभेतून गुट्टेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. एक शेतकरी कर्जबाजारी दाखवा, राजीनामा देतो. असे छातीठोकपणे दावा करणार्‍या गुट्टे यांनी खरोखरच राजीनामा द्यावा. अशी मागणी जाधव यांनी केली. आज अनेक शेतकर्‍यांना न्यायालयाच्या नोटीसा आल्या आहेत. त्यांचे बँकेतील के्रडीट खल्लास झाले आहे, असे असतांनासुध्दा गुट्टे हे काहीही न घडल्याचा अविर्भाव आणत आहेत तो चुकीचा आहे. असे स्पष्ट करीत जाधव यांनी गुट्टे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची फसवणूक केली. अनेक प्रकरणांमधून अनेकांना अडचणीत आणले. गुट्टे यांनी हे प्रकार थांबविले पाहिजेत. ते एक जबाबदार लोक प्रतिनिधी आहेत. याची जाणीव ठेवली पाहिजे. असे नमूद करीत खासदार जाधव यांनी गुट्टे यांनी दादागिरीची भाषा करु नये. त्यांना त्याच भाषेत आम्हालाही उत्तर देता येईल. असा इशारा दिला.दरम्यान, या मोर्चात शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासह हजारो शेतकरी बांधव सहभागी होते.

Post a Comment

Previous Post Next Post