आगामी संसदीय अधिवेशनात धनगर आरक्षण अंमलबजावणीसंदर्भातला वटहुकूम काढावा अन्यथा रस्त्यावर उतरणार : चिमण डांगे, प्रदेश अध्यक्ष- धनगर समाज महासंघ

 



प्रेस मीडिया लाईव्ह  : 

कोल्हापूर- (प्रतिनिधी) -

  राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. आणि धनगर आरक्षण अंमलबजावणीचे आश्वासन देऊन भारतीय जनता पार्टी सत्तेत आलेली आहे. आश्वासन देऊनही जवळपास दहा वर्षे उलटत आहेत. त्यामुळे येणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात, राज्य आणि केंद्र सरकारने मिळून धनगर आरक्षण अंमलबजावणीसंदर्भातला वटहुकूम काढावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. ॲड. श्री. चिमण डांगे यांनी दिला आहे. ते धनगर समाज महासंघ आणि मल्हार सेना प्रणित समाज जागृती मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होते. 

  यावेळी प्रा. अरुण घोडके- इतिहास संशोधक, बबन रानगे- मल्हार सेना सरसेनापती, राघू हजारे- जिल्हाध्यक्ष- धनगर समाज महासंघ, रामचंद्र रेवडे- सामाजिक कार्यकर्ते, शहाजी सिद्ध - जिल्हाप्रमुख मल्हार सेना, देवाप्पा चोपडे, छगन नांगरे, गंगाराम बाजारी, बाळासो दाईंगडे, लिंबाजी हजारे, विठ्ठल भमान, विठ्ठल भमानगोळ, शामराव माने, भगवान हराळे, शशिकांत पुजारी, बळी लांडगे, पांडुरंग वगरे, दत्ता बोडके, बंडोपंत बरगाले, आनंद देशिंगे, दिलीप भानुसे, आनंद डफडे, सखाराम जानकर, विक्रम शिनगारे, पांडुरंग बोडेकर आदी उपस्थित होते.

        महाराष्ट्रात आणि देशात सध्या भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे त्यातच अजित पवार यांचाही एक गट महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाला आहे. अजित पवार यांनीही धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला उच्च न्यायालयात सुरू असलेली धनगर आरक्षण सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीत राज्य आणि केंद्र सरकारने मिळून धनगर जमातीसाठी एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यास राज्य व केंद्र सरकार तयार असल्याचे एकत्रित प्रतिज्ञापत्र सादर करावे असे आवाहन चिमण डांगे यांनी केले आहे. 

      तर इतिहास संशोधक प्रा. अरुण घोडके यांनी धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास उलघडून सांगितला. ते म्हणाले की, धनगर जमातीला थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता- राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराज यशवंतराव होळकर यांच्या विचारांचा गौरवशाली वारसा लाभला आहे आणि आपल्याला हा वारसा आणखी समृद्ध करायचा आहे. त्यामुळे सर्वच महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी आता आपल्यावरती येऊन ठेपली आहे. कारण आज आपल्या देशाला कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर या सर्व महापुरुषांच्या विचारांची गरज भासू लागली आहे.

 तर मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी धनगर आरक्षण रणसिंग फुंकताना कोल्हापूर जिल्हा त्यामध्ये कुठेही पाठीमागे राहणार नाही. तसेच महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्रित करून हा लढा जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही असे सांगितले. आणि या लढाईची सुरुवात आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्मभूमीतूनच करू असेही सांगितले.

  गोकुळचे संचालक मा. श्री. बयाजी शेळके यांनी यावेळेस संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेचे जे पुण्यश्लोक, लोकमाता- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे स्वप्न होते ते स्वप्न सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या सहकार्याने पूर्णत्वास येत असल्याचे सांगून त्यांनी साने गुरुजी वसाहतमधील आपटे नगर चौक येथे सुरू असलेल्या स्मारकाच्या बांधकामासंदर्भातली माहिती दिली आणि या स्मारकाचे शिल्पकार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे समाजाच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले. तसेच त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडून तो मंजूरही केला. 

             या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील गुणवंत मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंतांचा शाल, श्रीफळ, मानाचा फेटा, अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कोळेकर आणि राजू दलवाई यांचाही त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. 

          शाहू स्मारक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत राघू हजारे यांनी केले, प्रास्ताविक बाबुराव बोडके यांनी केले, तर ठरावाचे वाचन रामचंद्र रेवडे यांनी केले. सूत्रसंचालन सचिन सलगर यांनी केले. शेवटी मायाप्पा धनगर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. 

यावेळी मांडलेले ठराव पुढीलप्रमाणे...

१) पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने संशोधन- प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करून समाजाचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावा..

२) धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करावी आणि उच्च न्यायालयात एकत्रित प्रतिज्ञापत्र सादर करावे. 

३) धनगर जमातीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे

४) धनगर वाड्यावरील पायाभूत सोई - सुविधांसठी विशेष आर्थिक तरतूद करावी आणि वन हक्क कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करून न्याय द्यावा. 

६) मेंढपाळ बांधवांच्यासाठी कुऱ्हाड बंदी व चराईबंदी उठवावी आणि बकरी चोरापासून मेंढपाळांचे संरक्षण करावे....

Post a Comment

Previous Post Next Post