"आम्हाला फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्या" या एकमेव मागणी साठी राज्यातील शिक्षक ५ सप्टेंबर रोजी काळ्या फीती लावून निषेध अंदोलन करणार

 प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांची माहीती



प्रेस मीडिया लाईव्ह : 

विशेष प्रतिनिधी :  संभाजी चौगुले

 राज्यातील  शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करुन शिक्षकांना फक्त शिकवू द्यावे या एकमेव मागणी साठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली  मंगळवार दि.५ सप्टेंबर शिक्षक दिनी संपुर्ण राज्यातील शिक्षक काळ्या फीती लावून शाळेत निषेध अंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.


राज्यातील जिल्हापरिषद ,नगरपालिका व महानगर पालिकेतील शिक्षकांना अध्यापना ऐवजी इतर अशैक्षणिक कामेच जास्त  लावली जातात त्या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .हे नुकसान टाळण्यासाठी जिल्हापरिषद नगरपालिका व महानगर पालिकेतील शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक काम न देता "फक्त आम्हाला  विद्यार्थ्यांना शिकवू द्या"  या विद्यार्थ्यांच्या हिताच्या व महत्वाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  मंगळवार ५ सप्टेंबर शिक्षक दिनी राज्यातील सर्व शिक्षक आपआपल्या शाळेत काळ्या फीती लावून  निषेध अंदोलन करणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना जनगणना,निवडणुक ,आपत्तीकाळात मदत एवढीच कामे करावीत असे न्यायालयाचे व शासनाचे आदेश असतांना राष्ट्रीय कामाच्या नावाखाली अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात. यात प्रामुख्याने मतदार नोंदणी[बीएलओ] कुटूंब सर्वेक्षण , विविध प्रकारची आँनलाईन  माहीती भरणे, उपस्थिती भत्त्याच्या नोंदी करणे, ४० पेक्षा जास्त नोंदवह्या अद्यावत ठेवणे,लसीकरण मोहिम राबवणे,जंतुनाशक गोळ्या वाटप व अहवाल देणे, शासनाची कोणत्याही मोहिमेच्या प्रचारासाठी प्रभातफेरी काढणे, मध्यांन्ह भोजनाच्या नोंदी करणे/ हिशोब ठेवणे, भाजीपाला खरेदी करणे त्याचा हिशोब ठेवणे, विद्यार्थ्यांचे  आधार अपडेट करणे,

लोकवाटा जमा करुन शाळेच्या गरजा भागवणे,विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन घेणे, विमा योजनेचा लाभ देणे, वेगवेगळ्या योजना व परीक्षांचे आँनलाईन अर्ज भरणे, घरोघर फीरुन शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांच्या नोंदी ठेवणे, पोलिस पंचनाम्यामध्ये पंच म्हणून उपस्थित राहणे, शासनाच्या विविध विभागास सहकार्य करणे. वृक्षलागवड अहवाल देणे, सरल प्रणालीची माहीती भरणे,युडायस माहीती भरणे, कोकणात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शिक्षकांची नेमणूक , गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्याची व्यवस्था करणे, अशा विविध प्रकारची छोटीमोठी मिळुन ७५ पेक्षा जास्त अशैक्षणिक कामे  राष्ट्रीय कामे म्हणून शिक्षकांच्या माथी मारली जातात ती नाही केली तर कार्यवाहीचा बडगा उभारला जातो  म्हणून शिक्षकांना अध्यापना साठी कमी वेळ मिळतो. म्हणून शिक्षका कडील सर्व अशैक्षणिक कामे काढुन घेऊन त्यांना फक्त अध्यापनाचेच काम द्यावे या साठी ५ सप्टेंबर रोजी "आम्हाला फक्त शिकवू द्या"  या एकमेव मागणी साठी काळ्याफीती लावून निषेध अंदोलन करण्यात येणार आहे.

तरी राज्यातील सर्व शिक्षकांनी काळ्या फीती लावून निषेध अंदोलनात सहभागी असे आवाहन  राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे , प्रदेशाध्यक्ष अंबादास वाजे,. महासचिव बाळासाहेब झावरे,सरचिटणीस आबासाहेब जगताप,कार्याध्यक्ष पोपटराव सुर्यवंशी , कार्यकारी प्रमुख म.ज मोरे,कोषाध्यक्ष उत्तम वायाळ, सोमनाथ टकले,भक्तराज दिवाने ,संतोष देशपांडे ,विठ्ठल माने,अर्जुन गुंजाळ, सुधीर वाघमारे, एल.बी.पडवळ,व्यंकटराव पोतदार, श्रीनिवास गंलाडे यांनी केले आहे.

चौकट

----------------------------------------------

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना राष्ट्रीय कामाच्या नावाखाली विविध प्रकारची ७५ अशैक्षणिक कामे लावली जातात .याचा प्रतिकुल परिणाम त्यांच्या अध्यापनावर व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. ईतर अशैक्षणिक कामे राष्ट्रीय कामे म्हणून शिक्षकांना लावली जातात .मग सर्व सामान्य जनतेच्या मुलांना अध्यापन करणे हे काम राष्ट्रीय नाही का ? असा प्रश्न पडतो. ईतर अशैक्षणिक कामे इतर सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडुन करुन घेणे अवश्यक आहे.


बाळकृष्ण तांबारे : राष्ट्रीय उपाध्यक्ष 

राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघ


Post a Comment

Previous Post Next Post