कर्जत तहसील कार्यालयात अँटी करप्शनची धाड

 अव्वल कारकुन रवी दशरथ सोनकांबळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या ताब्यात 


प्रेस मीडिया लाईव्ह

 कर्जत  प्रतिनिधी :  नरेश जाधव   

कर्जत तहसील कार्यालयातील अव्वल कारकून रवी दशरथराव सोनकांबळे यास जप्तीचे वॉरंट बजावण्याकरिता दहा हजारांची लाच घेताना अलिबाग येथील येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

  याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार (पुरुष वय 36 वर्षे ) यांनी महारेरा या ठिकाणी बिल्डर विरुद्ध तक्रार करून रक्कम रुपये 13,91,135/- एवढ्या रकमेचे जप्ती वॉरंट प्राप्त केले होते. सदर जप्ती वॉरंटची बजावणी करण्याकरिता दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी जप्ती वॉरंट जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड या ठिकाणी जमा केले होते सदर जप्ती वॉरंट बजावण्या करिता तहसील कार्यालय, कर्जत या ठिकाणी पाठविण्यात आलेले होते. सदर जप्ती वॉरंट बजावण्याकरिता आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांच्याकडून 1,00,000/- रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती 40,000 /- रूपये लाचेची मागणी करून यापुर्वी 20,000/- रूपये लाचेची रक्कम स्विकारल्याबाबत व 20,000/- रूपये लाचेची मागणी करीत असलेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तकार प्राप्त झाली होती.

         तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.54 ते 2.20 वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय कर्जत येथे तक्रारदार यांचेकडून पुन्हा स्वतः करीता 10,000/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांनी सापळ्याचे आयोजन करून दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी  सायंकाळी 4.35 वाजता तक्रारदार यांचेकडून 10,000/- रूपये लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.

   सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभाग रायगडचे उप अधीक्षक शशिकांतपाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अरुण करकरे, सहाय्यक फौजदार विनोद जाधव, सहायक फौजदार शरद नाईक, पोलीस हवालदार महेश पाटील, यांनी केली आहे.

   जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारीकर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी दुरध्वनी क्रमांक 02141 - 222331 ह्या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post