भारतीय स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ मानवी स्वातंत्र्यलढा - वसंत भोसले

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी : प्रतिनिधी 

भारतीय स्वातंत्र्यलढा हा जगाच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ मानवी स्वातंत्र्यलढा आहे. स्वातंत्र्य लढ्याने आपल्याला देश म्हणून एकत्र केले. बहुविविधतेतून ऐक्य साधले.उद्याचा भारत कसा असेल याची चर्चा स्वातंत्र्य आंदोलनातील भारतीय नेते जनतेशी करत होते.गांधीजी, नेहरू यांच्यासह सर्वांनी सार्वजनिक जीवनात सभ्यता आणि नीतिमूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतर लगेचच धरणे, कारखाने ,शेती ,व्यापार , वीजकेंद्रे ,शाळा ,सार्वजनिक वाहतूक यासारख्या विविध पायाभूत उभारणीचे काम कोणतीही संसाधने जवळ नसताना सुरू केली. अडचणींना आव्हानांना तोंड देत हा विशाल देश विकसित करण्याचा पाया रचला.ही सारी वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे,असे मत ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी व्यक्त केले .ते समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालयाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ' भारतीय स्वातंत्र्याची वाटचाल ' या विषयावर बोलत होते. प्रसाद कुलकर्णी  यांनी स्वागत व प्रस्ताविक केले .यावेळी जयकुमार कोले यांच्या हस्ते वसंत भोसले यांचा आचार्य अत्रे व भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. 


वसंत भोसले म्हणाले ,पंडित जवाहरलाल नेहरूंनी पहिल्या स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात नियतीशी करार केला होता. स्वातंत्र्याच्या सूर्याची उगवण होऊन त्या प्रकाशात आपण पुढे जायचे आहे ही ती भूमिका होती. त्यानंतर या देशाने भारतीय राज्यघटना तयार केली.आणि या देशाची एक रचना ,दिशा निर्माण  केली. आज त्या रचनेवर घाव घातले जात आहेत.राष्ट्रीय चळवळीची मूल्ये मानणारी पिढी अजून सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. मात्र आणखी वीस -तीस वर्षांनी या मूल्यांचे काय होईल याचा विचार आपण करण्याची गरज आहे.देश,भाषा ,संस्कृती या सीमांच्या पलीकडे आज पृथ्वीच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे .आजवरच्या वाटचालीत सामान्यांच्या विवेकानेच आपण पुढे गेलेलो आहोत.मुल जन्माला नऊ दिवसात येत नसते तर त्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी जावा लागतो. त्याच पद्धतीने  देश गेल्या नऊ वर्षात तयार झालेला नाही तर त्याच्या उभारणी अनेक दशकांच्या परिश्रमाने आणि आकाशाच्या उंचीच्या अनेक नेत्यांमुळे झालेली आहे. त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

वसंत भोसले पुढे म्हणाले लोकसंख्या, शिक्षण ,आरोग्य, पर्यावरण, अन्नसुरक्षा आदी प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करावी लागेल .आज पिकवणारे अल्पमतात आणि खाणारे बहुमतात आहेत.शेतीसाठी पीक पद्धतीच्या पुनर्विचाराची गरज आहे. तसेच विकासाच्या गोष्टी चर्चा करत असताना सणांपूर्वी पोलिस संचालन करावं लागते सुदृढ समाज व्यवस्थेचे लक्षण नाही. सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यासाठी  समाज जीवनात समता प्रस्थापित होईल असे प्रयत्न केले पाहिजे. घटनात्मक मूल्यांवर होणारे आक्रमण थोप वायचे असेल तर भारतीय स्वातंत्र्य लढा व भारतीय राज्यघटना यांनी दिलेला शिकवण पुन्हा एकदा समाज जीवनात रुजवण्याची गरज आहे.  वसंत भोसले यांनी या विषयाची अतिशय सखोल व सूत्रबद्ध मांडणी केली. आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली.प्रा. रमेश लवटे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post