राष्ट्रपित्याच्या बदनामीबद्दल सरकारनेच संभाजी भिडे यांचेवर खटला दाखल करावा ...मागणी



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी ता.३१, भारतावर आणि त्यातील महाराष्ट्रावर पाण्याबाबत निसर्गाने वरदहस्त ठेवलेला आहे. जगाच्या इतर भागांच्या मानाने आपण पाण्याबाबत संपन्न आहोत.हे वास्तव असूनही पाण्याचे योग्य नियोजन आणि त्याचा पुनर्वापर याकडे आपण गांभीर्याने पाहत नाही. उलट पाण्याचा प्रश्न सदैव पेटताच राहिलेला आहे. आपल्या देशांतर्गत मानवी स्वास्थ्याचा आणि जागतिक स्तरावर तिसऱ्या महायुद्धाचा विषय पाणी ठरलेले असूनही जर आपण त्याकडे दुर्लक्ष करणार असून तरी येणाऱ्या संकटाचे दोषी फक्त आणि फक्त आपणच असू . पाण्याचा प्रश्न हा अंतिमतः आमच्या अविवेकी धोरणांचा, दीर्घकालीन नियोजन दृष्टीच्या अभावाचा आणि अर्थातच आमच्या वैचारिक दारिद्र्यातून निर्माण झालेला आहे. आपल्या साक्षरतेच्या व्याख्येत विचारसाक्षरता आणि जलसाक्षरता यांचा समावेश केला आणि त्याचा प्रत्येकाने अंगीकार केला तरच पाण्याच्या प्रश्नावर आपण काही एक नेमके उत्तर शोधू शकू,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.' प्रश्न पाण्याचा 'हा चर्चासत्राचा विषय होता.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर,प्रा.रमेश लवटे,दयानंद लिपारे,देवदत्त कुंभार,अप्पा पाटील, रामभाऊ ठिकणे, महालींग कोळेकर,अशोक मगदूम, यांनी सहभाग घेतला.यावेळी संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी जे विकृत,खोडसाळ, असत्य विधान केले त्याचा जाहीर निषेध करण्यात आला.तसेच राष्ट्रपित्याच्या बदनामीबद्दल सरकारनेच त्यांच्यावर खटला दाखल करावा जेणेकरून अशा विकृतीला आळा बसेल अशी मागणी करण्यात आली.

या चर्चासत्रात असे मत व्यक्त करण्यात आले की, पाणी प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर आपण सिंचनाचे धोरण बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याला किमान एका पिकाला सिंचनाचा लाभ झाला पाहिजे.पाण्याचा सुयोग्य आणि नियंत्रित वापर झाला पाहिजे. कमी पाण्यात, कमी दिवसात येणाऱ्या पिकाला प्राधान्य दिले पाहिजे. भूपृष्ठावरील आणि खालीलही जलसाठ्याचा संतुलित वापर केला पाहिजे. पिकांचे नियोजन आणि पीकवार क्षेत्ररचना याचा विचार केला पाहिजे. सिंचन धोरण आणखी व्यवस्थित झाले तर आहे या पाण्याचा नेमका वापर होऊ शकेल. त्यातून आपली समृद्धताही वाढत जाईल. स्वयंपूर्ण समृद्धतेची कास पकडणे सोपे होईल. पाण्याचे बाजारीकरण करून ,ते महाग करून पाण्याचा प्रश्न सुटत नाही. उलट बाजारपेठेत पाणी आणल्याने माणसा माणसातील दरी वाढणार आहे आणि ओलावा संपणार आहे. बदलत्या व्यवस्थेत पाण्याकडे आर्थिक वस्तू म्हणून पाहिले जात आहे. हे घातक आहे. कारण पाणी हे मूलतः  सामाजिक वस्तू आहे .म्हणूनच केवळ कार्यक्षम जलव्यवस्थापनातूनच पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. पाणी हे जीवन आहे, जगण्याचा हक्क हा मानवी हक्क आहे. त्यामुळे पाण्याचा हक्क हा स्वतंत्रपणे मानवी हक्क आहे याचे भान ठेवण्याची गरज आहे. या चर्चासत्रामध्ये पाणी विषयक विविध समस्यांवर मांडणी करण्यात आली.या चर्चासत्रास तुकाराम अपराध,डी.एस. डोणे, शकील मुल्ला, गजानन पाटील, शहाजी धस्ते आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post