गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जोरदार कारवाई करत गांजा, मेफेड्रॉन आणि चरस विकण्यासाठी आलेल्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे :  अमली पदार्थ तस्करींचे प्रमाण वाढले असून, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जोरदार कारवाई करत गांजा, मेफेड्रॉन आणि चरस विकण्यासाठी आलेल्या तस्करांच्या  मुसक्या आवळल्या आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाने २६ लाखांचा ऐवज जप्त करत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील एरंडवणे, कोंढवा आणि पुणे स्टेशन भागात ही कारवाई करण्यात आली.

संकल्प सुरेश सकपाळ (वय ३३, रा. मुंबई), शाहरूख मुस्तफा बेग (वय २१, रा. कोंढवा), मंटु रामबाबु राय (वय ३३, रा. बिहार), राकेशकुमार रामनाथ दास (१९, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. चौघांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी, कर्मचारी गस्तीवर होते. दरम्यान एरंडवणे भागात सकपाळ थांबला असून त्याच्याकडे मॅफेड्रॉन असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार सपकाळला ताब्यात घेत झडती घेतली. त्याच्याकडे ११ लाखांचे ५५ ग्रॅम एमडी आढळून आले. तसेच, कोंढव्यातील हगवणे वस्ती परिसरातून शाहरूख बेगला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे १ लाख ४० हजारांचे मॅफेड्रॉन व ८१ हजारांचे चरस जप्त करण्यात आले. शेख वर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. याशिवाय पुणे रेल्वे स्टेशन परिसरात केलेल्या कारवाईत मंटु व राकेशकुमार यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजारांचा ६३ किलो ६९४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोघांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post