आता काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून जनतेसाठी काम केले पाहिजे...प्राचार्य आनंद मेणसे .



प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी ता.२१, देशाचे राजकारण जेव्हा जेव्हा अती उजवीकडे झुकते तेव्हा तेव्हा त्याला थोपवण्याचे काम कर्नाटका मधून झालेले आहे. हे या निवडणुकीमधूनही सिद्ध झालेले आहे. धार्मिक ध्रुवीकरणावर आधारित असभ्य आणि संविधानिक मूल्यांना तडे देणारा प्रचार आणि भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगार आदी जनतेच्या मुद्द्यांवर आधारित आक्रमक प्रचार अशा लढाईमध्ये काँग्रेसने बाजी मारली. काँग्रेसने जातीवादा विरोधात ठाम व स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे समाजातील विचार करणारा वर्गही पुढे आला व पाठीराखा बनला. बऱ्याच ठिकाणी मत विभाजन टाळले गेले तसेच जनतेनेच ही निवडणूक दुरंगी केली. जनतेने काँग्रेसला विजयी करून आपले काम केले आहे .आता काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून जनतेसाठी काम केले पाहिजे.यावर्षी होणाऱ्या राजस्थान ,मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड व मिझोराम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाऐवजी जनतेच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली गेली पाहिजे. असा आदेश महागाई ,भ्रष्टाचार,बेरोजगारी यांना विटलेली जनता देऊ शकते हे कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहे. हाच या निकालांचा अन्वयार्थ आहे,असे मत ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित व्याख्यानात 'कर्नाटक विधानसभा निकालांचा अन्वयार्थ ' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.डॉ. अशोक चौसाळकर होते .प्रारंभी जयकुमार कोले यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले .प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून या व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. 

प्राचार्य आनंद मेणसे  म्हणाले, या निवडणुकीत भ्रष्टाचार हा मुख्य विषय होताच.त्याचबरोबर मौलाना आझाद स्कॉलरशिप रद्द करणे, चार टक्के मुस्लिम आरक्षण रद्द करणे आदी काही थेट मुस्लिम विरोधी निर्णय लोकांना पसंत पडलेले नाहीत. तसेच अमूल विरुद्ध नंदिनी हा दुधाचा मुद्दा आहे भाजपच्या विरोधात गेला. काँग्रेसच्या सिद्धरामय्या व शिवकुमार या जोडीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची एक सूत्रबद्ध यंत्रणा राबवली. तर भाजपकडे मा.पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय अन्य चेहरा नव्हता. देशाच्या पंतप्रधानांनी व गृहमंत्र्यांनी एखाद्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत किती व कसा प्रचार करावा याला मर्यादा असतात पण यावेळी त्या मर्यादा पाळल्या गेल्या नाहीत. मणिपूर जळत असताना आणि दिल्लीतील महिला पैलवान आपल्यावरील अत्याचारा विरोधी आंदोलन करत असताना देशाचे नेतृत्व कर्नाटकात ठिय्या मारून सभा घेत व रोड शो करत आहे हे जनतेला पसंत पडले नाही. त्यामुळे कर्नाटका बाहेरील मुद्द्यांचा सुद्धा या निवडणूक निकालांवर मोठा परिणाम झाला.

प्राचार्य आनंद मेणसे  पुढे म्हणाले,काँग्रेसचा प्रचार भेदक झाला तेंव्हा भाजपाचा राष्ट्रीय नेत्यांचा प्रचारही डळमळीत झाला.काँग्रेसने बजरंग दला बरोबरच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा ही उल्लेख केला होता. पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून

 बटन दाबताना जय बजरंगबली म्हणा,खोटी आकडेवारी असूनही द केरळा स्टोरी चित्रपटाचा विखारी प्रचार केला गेला.तो लोकांना पसंत पडला नाही. गुजरात प्रमाणे कर्नाटकलाही प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न मतदारांनी उधळून लावला. राहुल गांधी यांच्या नफरत छोडो भारत जोडो यात्रेचा सकारात्मक परिणाम कर्नाटकात दिसून आला. प्राचार्य मेणसे यांनी आपल्या सव्वा तासाच्या ओघवत्या शैलीतील भाषणात या विषयाचे अतिशय सखोल विश्लेषण केले.तसेच श्रोत्यांच्या प्रश्नांचे शंकांचे निरसनही केले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर म्हणाले, द्वेषाच्या राजकारणाने देशाचे भले होत नाही. धर्मावर आधारित राजकारणाप्रमाणेच जातीवर आधारित राजकारणही वाईट असते. धर्मवादाला जातवाद हे उत्तर नाही. तर गांधी आणि नेहरू यांचे समतेचे व विकासाचे राजकारण पुढे नेण्याची गरज आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी मताधिकार बजावला होता.ज्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक मताधिकार बजावतात तेव्हा तो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतो. हे आजवर सिद्ध झालेले आहे. कर्नाटकच्या जनतेने धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाऐवजी जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर राजकारण केंद्रित झाले पाहिजे. असा संदेश या निवडणुकीत द्वारे दिला आहे आणि तो स्वागतार्ह आहे.

या व्याख्यानास प्रा.डॉ. भारती पाटील,प्राचार्य डॉ.राजेंद्र कुंभार,जयकुमार कोले,अन्वर पटेल,विठ्ठल चोपडे, प्राचार्य ए.बी.पाटील, अजितमामा जाधव, मिलिंद कोले,अर्जुन रंगरेज, के. एम. पाटील, प्रमोदकुमार  पाटील ,शिवाजी पाटील,बजरंग लोणारी,प्रा.अशोक कांबळे,प्रा.शांताराम कांबळे,नौशाद शेडबाळे, सदा मलाबादे,किरण कटके,डॉ.तुषार घाटगे, धनंजय सागावकर,पांडुरंग पिसे ,शिवाजी साळुंखे,प्रकाश सुलतानपूरे,प्रल्हाद मेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सचिन पाटोळे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post