दोन मृत अर्भकांचा कुत्र्यांनी तोडले लचके

सीपीआर आवारातील खळबळजणक घटना ; पोलीस, रुग्णालय प्रशासन हादरले : कसूच चौकशी

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे:

   छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय (सीपीआर) आवारात शवविच्छेदन गृहापासून थोडया अंतरावर गुरुवारी सकाळी कुत्र्यांच्या तोंडात दोन मृत अर्भक सापडले. लचके तोडल्यामुळे अर्भकाचे अवयव गायब झाले होते. कर्मचाऱ्यांनी कुत्र्यांना हाकलून लावल्यानंतर अर्भक तेथेच टाकून ती पळून गेली. वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोरच पोलीसांनी अर्भकांचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली. ही अर्भके रुग्णालयातील नसून भिंतीच्या पलिकडे असणाऱ्या कोंडाळ्यातून ओढून आणल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. लक्ष्मीपुरी पोलीसांकडून कसून तपास सुरू आहे.

   गुरुवारी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास पोस्ट मार्टम विभागातील कर्मचारी योगेश येरुडकर याला भटक्या कुत्र्याच्या तोंडात एक मृत अर्भक दिसले. त्याने कुत्र्याला हाकलेले तेव्हा कुत्रा अर्भक तेथेच टाकून पळून गेला. थोडया वेळाने आणखी एक कुत्रा तोडात प्लॅस्टिक पिशवी घेऊन पळत तेथे आला, त्यांच्याकडील पिशवीतही एक अर्भक होते. येरुडकर याने त्या मोकाट कुत्र्याला दगड मारल्यानंतर त्याने पिशवी तेथेच टाकून पलायन केले.

    सहा ते चार महिने वाढ झालेली ही दोन्ही अर्भक मृत होती, कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे एका अर्भकाचे दोन्ही पाय गायब होते. तर एकाचा हात गायब होता. हा गंभीर प्रकार पाहून कर्मचारी तेथे जमा झाले,वैदद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर लक्ष्मीपूरी पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक इकबाल महात, संजय कोळी, हवालदार रेडेकर, करवीचे गणपती पोवार आदी पथक तेथे दाखल झाले.

    सीपीआरच्या पोष्ट मार्टम विभागाजवळ दोन मृत अर्भक सापडल्याची बातमी संपर्ण परिसरात पसरल्यानंतर बघ्यांनी गर्दी केली होती. पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात पाठविले. मृत अर्भकांचे लचके तोडल्याची घटना खूपच गंभीर आणि संतापजणक असल्याने या घटनेला कोण दोषी आहेत? याबाबत विचारणा करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांनी संतापजण प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून या घटनेचा कसून तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत.अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळाची पहाणी केली.

-------------

   * अर्भक आले कोठून

  सीपीआर रुग्णालयाच्या पश्चिमेच्या भिंतीजवळ एक कोंडाळा आहे,तेथे कचरा टाकला जातो. परिसरातील एखांद्या रुग्णालयातील मृत अर्भक पिशवीत बांधून या कोंडाळ्यात टाकली असावीत,कुत्र्यांनी ती ओढून सीपीआर आवारत आणल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सीसीटीव्हीचे फुटेज पाहिल्यानंतर एका कुत्र्याने अर्भक आणल्याचे दिसते मात्र ते कोठून आणले हे समजत नाही.

-------------

   * प्रस्तूती विभागाची झाडाझडती

  घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन सीपीआर प्रशासनाने प्रस्तूती विभागाची झाडाझडती घेऊन तपासणी केली, दोन दिवसात या ठिकाणी जन्मलेल्या बालकांची खात्री केली, त्यांच्या पालकांकडे विचारपूस केली. मात्र येथून एकही अर्भक मृत झाले नसल्याचे समजते.

--------------

   * दफनाची जबाबदारी पालकांची

  प्रस्तूती दरम्यान अथवा नंतर एखांदे बालक मृत झाले तर ते पालकांच्या ताब्यात दिले जाते. स्मशानभूमीत दफन करून त्याची रितसर पावती आणून रुग्णालयात द्यावी लागते. तरच त्या महिलेस डिसचार्ज दिला जातो. हे नियम काटेकोरपणे पाळले जातात. असे डॉक्टरांनी सांगितले.

-----------

  * मोकाट कुत्र्यांचा उच्छाद

 सीपीआर आवारात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्याचे वास्तव्य आहे. त्यांना कितीही हाकलून लावले तरी ते येतात, रात्रीच्या वेळी डॉक्टर,परिचारकांच्या अंगावर धाऊन येतात. अपघात विभागाच्या दारात जिन्यावर हे श्वान बिनधास्त झोपलेले असतात. यांचा बंदोबस्त करावा यासाठी डॉक्टरांनी महापालिकेला पत्रव्यवहारही केला असल्याचे समजते.


-----------

Post a Comment

Previous Post Next Post