गांधी भवन मधील 'रोजा इफ्तार' मधून एकात्मतेचा संदेश

 देश बळकट करण्यासाठी धार्मिक ऐक्य बळकट करावे : डॉ.कुमार सप्तर्षी

आत्मभान, कळवळा, भक्ती जागृतीसाठी उपवास परंपरा: आशीष जेम्स्


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल,इमादाद फाउंडेशन आणि जमाते इस्लामी हिंद या संघटनांच्या वतीने रविवारी,१६ एप्रिल २०२३ रोजी  गांधीभवन,कोथरूड येथे 'रोजा इफ्तार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी ५.४० वाजता हा कार्यक्रम झाला.'द सोसायटी ऑफ सेंट मेरी द व्हर्जिन इन इंडिया'चे संचालक आशीष जेम्स,डॉ.इक्राम काटेवाला(मुंबई) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुस्लीम धर्मीयांचा रमझानचा उपवास सोडण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन,प्रशांत कोठडिया ,संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर,मुख्तार मणियार,सचिन पांडुळे यांनी स्वागत केले.महमूद मणियार( इमादाद फाऊंडेशन), करीमुद्दीन शेख( जमात इस्लामी हिंद), पोलिस सेवेत निवड झालेल्या  अधिकारी तेहसिन बेग, सुदर्शन चखाले, माजी नगरसेविका अल्पना वर्पे,आर जे संग्राम उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ' भारतात सर्व धर्म आहेत. त्यांच्या चालीरिती समजून घेण्याची संधी आहे. हिंदू - मुस्लीम सद्भाव गांधींजींच्या प्रेरणेने आपण बळकट केले पाहिजे. प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत. आपल्या बंधू भगीनींचा पाहुणचार करून एकात्मता साधली पाहिजे. भारतात आता लोकशाही धोक्यात आहे.दोन धर्मात भांडण लावण्याचा प्रयत्न होत असला तरी आपण सामंजस्य, ऐक्य टिकवून ठेवले पाहिजे.एकमेकांना भेटत राहून पूर्वग्रह दूर केले पाहिजेत '.

' उपवास : एक सामाजिक गरज ' याविषयावर आशीष जेम्स्, डॉ. इक्रम कांटेवाला यांनी मार्गदर्शन  केले. आशीष जेम्स म्हणाले, 'ख्रिस्ती,मुस्लीम, ज्यू धर्मातील अनेक गोष्टी सारख्या असून उपवास परंपरा आहेत. आत्मभान, कळवळा, भक्तीभाव जागृत व्हावेत, असे उपवास परंपरेमागील प्रयोजन आहे '.

डॉ. इक्राम कांटेवाला म्हणाले, 'उपवास ही वैय्यक्तीक उपासना आहे. त्यामागचा उद्देश कालपरत्वे धूसर होऊ नये. उपवासादरम्यान प्रार्थना करून ईश्वराची अनुभूती घेत राहावे. भूक नावाच्या महाशक्तीची जाणीव या काळात होते. या भुकेचे लगाम आपल्या हाती ठेवणे ही शिकवणूक रमझानच्या महिन्यात मिळते.

'शांतता ,सौहार्द महत्वाचे असल्याने त्यासाठी रमझानच्या महिन्यात प्रार्थना केली जाते ', असे करीमुद्दीन शेख यांनी सांगीतले.





   




Post a Comment

Previous Post Next Post