जय कंपनीच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन करण्यात आले

 


प्रेस मीडिया लाईव्ह 

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

स्थानिक कामगारांच्या न्याय हक्कासाठी जय कंपनीच्या विरोधात खालापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृष्णा पारंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी गेट जवळ धरणे आंदोलन करण्यात आले. 

मोहोपाडा-रसायनी परिसरातील 90 टक्के कामगार व महिला कामगार हे जय कंपनीत काम करीत असून कंपनीच्या मुजोरीशाहीचा धिक्कार करण्यासाठी काँग्रेसतर्फे जनआंदोलन करण्यात आले. सेबी रोड येथे असणारी जय प्रिसिजन प्रॉडक्ट इंडिया प्रा.लि. या कंपनीने प्रकल्पग्रस्त स्थानिक महिला नोकरीत मोठ्या प्रमाणात असून महिला कामगारांना 8 तास ड्युटीनंतर कार्ड आउट करतात परंतु नंतर 2 ते 3 तास विना मोबदला त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. तसेच स्थानिक कामगारांना किमान वेतन दिला जात नाही. स्थानिक कामगारांच्या समस्येवर कोणी बोलले तर त्याची लगेच ट्रान्सफर ऑर्डर काढली व त्याला कामावरून घरी बसवलेे जाते. आत्तापर्यंत 20 ते 25 स्थानिक कामगारांवर अशी कारवाई करण्यात आली असून महिलांना रात्री 11 वाजता ड्युटी संपल्यानंतर घरापासून लांब रस्त्यावर सोडले जाते. कंपनी व्यवस्थापनाकडून वारंवार महिला कामगारांना अमानूष वागणूक मिळत असून गरीब गरजू कामगार 10 हजार पगारावर राबविल्या जात आहेत. शिवाय त्यातूनही युनियनच्या नावाखाली 2 हजार रूपये कटींग केले जात आहेत. गरीब गरजू महिला कामगारांच्या परिस्थितीनुसार व्यवस्थापनाकडून वारंवार गैरफायदा घेतला जात आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी खालापूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृष्णा पारंगे यांनी 9 मार्च रोजी धरणे आंदोलन केले आहे. यावेळी कंपनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून रॅली काढण्यात आली. त्यांच्या समवेत रायगड जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी अशोक मुंढे, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल ढवळे, प्रमोद राईलकर, अनंता दळवी, प्रतिक पाटील, सागर सुखदरे, देविदास म्हात्रे, दिप्ती म्हात्रे, भगवान जांभळे, संजय कांबळे यांच्यासह कामगार वर्ग व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कंपनीमध्ये गेल्या 2-3 वर्षांपासून मॅनेजमेंट तर्फे कामगारांची पिळवणूक सुरु आहे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्या कानावर होत्या, काही युवकांनी धाडस करून या विरोधात आवाज उठवला आहे पण मॅनेजमेंट तो आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. कामगार हे स्थानिक असून आपल्या काही स्थानिक मॅनेजमेंट स्टाफकडून त्यांना दमदाटी व कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत आहे. स्थानिकांच्या विरोधात स्थानिकांना उभे करून इंग्रजांची कपटनीती कंपनीकडून अवलंबली जात आहे, हि दडपशाही आम्ही चालू देणार नाही गरज पडल्यास रायगड जिल्हा युवक काँग्रेस तर्फे आरपारची लढाई करण्यास आम्ही तयार आहोत. 

- निखिल ढवळे (अध्यक्ष, रायगड जिल्हा युवक काँग्रेस)

जय कंपनी प्रशासन कामगारांना कामामध्ये विनाकारण त्रास देवून ट्रान्सफर करीत असून महिला वर्गांना रात्रीच्या वेळी सुट्टी झाल्यानंतर घरी जाण्यासाठी दोन-दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. शिवाय एखाद्या कामगारांना रजा टाकली तर त्याला सस्पेंड करून घरी बसविण्यात येते. कामगारांसाठी याठिकाणी युनियन असून ती युनियन कंपनीसाठी आहे की कामगारांसाठी आहे हा प्रश्‍न पडला असून युनियन ही पूर्णतः कामगार विरोधी असून परिसरातील महिला कामगारांनी याबाबत मला विनंती केल्यामुळे मी हे धरणे आंदोलन करीत आहे व स्थानिक कामगारांच्या अन्यायाबाबत जय कंपनीच्या विरोधात शेवटपर्यंत लढा चालू ठेवणार. - कृष्णा पारंगे, (अध्यक्ष, खालापूर तालुका काँग्रेस कमिटी)

Post a Comment

Previous Post Next Post