पत्रकार राजेंद्र जाधव यांचे उपोषण अखेर सुटले..

तहसीलदार व प्रातांधिकारी यांचे अवैध उत्खनन व भरावाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन .


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

खालापूर तहसीलदार, कर्जत तहसीलदार आणि कर्जत प्रातांधिकारी (SDM) यांनी खालापूर आणि कर्जत तालुक्यांतील अवैध उत्खनन आणि भरावाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (ABJF) रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र जाधव यांचे आमरण उपोषण बुधवार, दि. 29 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता सुटले. रायगड जिल्हा खनिकर्म अधिकारी मनोज मेश्राम, कनिष्ठ अधिकारी अफरोज बेग, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी आश्वासन पत्र देऊन पत्रकार राजेंद्र जाधव यांचे उपोषण सोडले. यावेळी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष व दैनिक कोकण प्रजा, कोकण प्रवाह, केपी न्यूज चॅनेल व इंटरपोल वेब पोर्टलचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव पत्रकार खलील सुर्वे, प्रदेश सचिव पत्रकार नरेश जाधव आदी उपस्थित होते.

महसूल विभागातील लाचखोर, भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांमुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याकडे राज्य शासन व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (एबीजेएफ) रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी दि. 28 मार्च 2023 पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणादरम्यान पत्रकार राजेंद्र जाधव यांनी गेल्या २-३ वर्षातील अवैध उत्खनन व भरावाची विभागीय चौकशी करून भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली होती. कर्जत उपविभागीय अधिकारी (एसडीएम) अजित नैराळे व खालापूर तहसीलदार अय्युब तांबोळी, कर्जत तहसीलदार शीतल रसाळ यांनी वारंवार तक्रारी करूनही खालापूर व कर्जत तालुक्यातील अवैध उत्खनन व भरावाच्या तपासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. कर्जत-खालापूर येथील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन रायगड जिल्हाध्यक्ष पत्रकार राजेंद्र जाधव यांनी महिनाभरापूर्वी महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. यासोबतच माझ्या मागण्यांबाबत प्रशासनाने कोणताही निर्णय न घेतल्यास 11 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आज खालापूर तहसीलदार, कर्जत तहसीलदार व कर्जत प्रातांधिकारी यांच्या आश्वासनानंतर तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी मनोज मेश्राम यांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर पत्रकार राजेंद्र जाधव यांनी उपोषण सोडले.

Post a Comment

Previous Post Next Post