पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी युवकाला विशेष शाखेने पकडले

 युवकाकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त करण्यात आले आहे


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी युवकाला विशेष शाखेने पकडले  असून युवकाकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त करण्यात आले आहे. जन्माने पाकिस्तानी असलेल्या युवकाची आजी आणि मामा पुण्यात राहायला आहेत.कौटुंबिक वादातून त्याच्या आईने पाकिस्तानी पती अमान यांच्यापासून फारकत घेतली आणि ती संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) राहायला गेली. 2015 मध्ये या मुलाला तिने पुण्यात आजीकडे शालेय शिक्षणासाठी पाठविले. मुलाने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवले. त्यानंतर तो आईला भेटायला विमानाने दुबईतही गेला होता. पुण्यात शिक्षण घेत असताना त्याने जन्म पाकिस्तानात झाल्याचे लपवून ठेवले. कौटुंबिक वादातून पाकिस्तानात जन्मलेल्या युवकाची फरफट झाल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.

अन्सारी पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. महम्मद अमान अन्सारी (वय 22) असे अटक केलेल्याचे पूर्ण नाव आहे. अन्सारीच्या विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करीत आहेत.

पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागातील पथकाकडून परदेशी नागरिकांची माहिती घेण्यात येते. त्यावेळी महम्मद अन्सारी बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा तो पुण्यात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे उघड झाले. त्याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पारपत्र मिळवल्याचे उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
– आर. राजा, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, पुणे पोलीस

Post a Comment

Previous Post Next Post