संजय राऊत चुकलात तुम्ही ! 'डाकू मंडळा' ला 'चोर मंडळ' का म्हणालात ?


प्रेस मीडिया लाईव्ह :

दत्तकुमार खंडागळे : संपादक वज्रधारी,

 मो. 9561551006

आज राज्याच्या दोन्ही सभागृहात शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव मांडला. कनिष्ठ सभागृहात तो मंजूर करण्यात आला आहे तर वरिष्ठ सभागृहातही सात जणाची समिती नेमण्यात आली असून चौकशीअंती निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. विधानसभा अध्यक्षांनी पंधरा जणांची समिती नेमली आहे. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक उतावळे झाले होते. खासकरून खोकेवाले असा ज्यांच्यावर आरोप होतो ते खुपच उतावळे होते. संजय राऊत यांनी चोर मंडळ म्हंटले तसे या खोकेवाल्यांना संधीच  सापडली. त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा धागा पकडत त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे. द्वेषाच्या राजकारणाने पछाडलेले लोक दुसरं काय करणार ? ते हेच करणार होते. ते याच्याही पलिकडे जाऊन आपल्या विकृत बुध्दीचे प्रदर्शन करतील. सत्तेचा माज कसा असतो ? काय असतो ? ते येणा-या काळात महाराष्ट्र पाहिलच. पण या सगळ्यात संजय राऊत यांची मोठी चुक झाली आहे. त्यांनी 'चोर मंडळ' म्हणायला नको होते. 'डाकू' मंडळाला 'चोर' मंडळ म्हणणे चुकच आहे. त्यांनी मोठा अपराध केला आहे. या गुन्ह्यासाठी संजय राऊतांना अजिबात सोडू नये. ते डाकूंना चोर कसे काय म्हणू शकतात ? आज डाकू लोकांचे बहूमत झाले आहे. सत्ता त्यांचीच आहे. महाशक्ती त्यांच्या पाठीशी आहे. असे असताना डाकूंना चोर संबोधने हा मोठा गुन्हा आहे.


       संजय राऊतांनी डाकूंचा अपमान केला आहे. डाकू मंडळाची अब्रू घालवली आहे. त्यामुळे  सरकारने त्यांना अजिबात सोडू नये. जमलेच तर सभागृहातच त्यांना फाशी द्यावी. भविष्यात अशी चुक कुणी करता कामा नये. 'डाकू' मंडळाला 'चोर' मंडळ म्हणण्याची हिम्मत कुणी करू नये. संजय राऊत यांना कठोरातली कठोर सजा व्हायलाच हवी. शक्यतो सभागृहात किंवा सभागृहाच्या समोर असणा-या मैदानात त्यांना जाहिर फाशी दिली तर चालेल. तेच योग्य होईल. कारण असा अपमान करण्याची त्यांची हिम्मत झालीच कशी ?  याच सन्मानीय सभागृहाचे सदस्य असलेले नितेश राणे आज सभागृहात बोलताना म्हणाले, संजय राऊतांची पंधरा मिनिटं सुरक्षा काढा ते उद्या दिसणारही नाहीत. सभागृहात जाहिरपणे खून करण्याची भाषा बोलणारी अशी महान महान माणसं ज्या सभागृहात आहेत ते सभागृह चोर मंडळ कसे ? देवेंद्र फडणवीसांरखा शब्द पाळणारा, नेहमी खरे बोलणारा, विरोधात असताना वीज बिल माफ करा म्हणणारा व सत्ता आल्यावर सोईस्कर विसरून आपलीच मागणी फाट्यावर मारणारा राजा हरिश्चंद्र ज्या सभागृहात आहे ते मंडळ चोर मंडळ कसे असेल ? सभागृहात एकमेकांची आय-बहिण काढणारे, अंगावर मारायला, कपडे फाडायला धावून जाणारे सन्माननीय सदस्य जिथे आहेत ते सभागृह चोर मंडळ कसे असेल ? संजय राऊत तुम्ही वेडे आहात. अशा सन्माननीय लोकांच्या मंडळाला डाकू मंडळ म्हणतात चोर मंडळ नव्हे. 

  संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणा-या सर्व लोकांनी स्वत:च्या गिर्रेबानमध्ये डोकावून पहावं. आपण खरच सभागृहाच्या मर्यादेचे व पावित्र्याचे पालन करतो का ? तसे आचरण स्वत: करतो का ? स्वत:चे व्यवहार, कर्तृत्व त्या सभागृहात जायच्या लायकीचे आहेत का ? याचे प्रामाणिकपणे आत्मचिंतन या सदस्यांनी करावे. त्यांना जे उत्तर मिळेल त्यावरून त्यांनीच ठरवावे की सभागृहाचा खरा हक्कभंग कोण करतय ? संजय राऊत चोर मंडळ म्हणाले पण त्या सभागृहावर तुम्ही लोक रोज बलात्कार करताय त्याचे काय ? 

सभागृहाचे सदस्य आहात, तुम्हाला हक्कभंग ठराव मांडायचा हक्क आहे म्हणून राऊतांच्या विरोधात हक्कभंग आणला इथपर्यंत ठिक आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता डाकू प्रवृत्तीच्या लोकांनी सभागृह भरले आहे. ज्यांची लायकी तुरूंगात रहायची आहे असे लोक तिथे सदस्य आहेत. असे डाकू ज्या सभागृहात आहेत त्याला चोर मंडळ म्हणणे चुकीचे आहे. आज सभागृहात ज्या ज्या नेत्यांनी भाषण केली त्यांनी स्वत:च्या अंत:करणात डोकावून पहावे. अतुल भातखळकर आज मोठ्या तोंडाने 'स्त्री दाक्षिण्य' सांगत होते. संजय राठोडला मंत्रीमडळात घेताना त्यांचे हेच तोंड कुठे गेले होते ? भाजपाच्या गणेश पांडेने एका मुलीचा विनयभंग केला तेव्हा भातखळकर कुठे होते ? असे अनेक प्रश्न आहेत. विद्यमान अनेक सदस्यांच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे आहेत त्याचे काय ? सत्ता तुमची आहे, तुमच्या हातात हक्क, अधिकार आहेत. इतरांच्याविरूध्द हक्कभंग आणाल पण स्वत:च सभागृहाचा सन्मान रोज पायदळी तुडवता त्याचे काय ? तुम्ही लोक जगता का त्या लायकीने आणि त्या उंचीने ? हा प्रश्न स्वत:ला विचारा.

Post a Comment

Previous Post Next Post