चूक आरटीओ एजन्सीची मनस्ताप वाहनधारकांना

 नागरिकांना वाहन परवाने छापून देण्यास दिरंगाई करणाऱ्या यूटीएल या एजन्सीवर कारवाई करा - अपना वतन संघटनेची मागणी


प्रेस मीडिया लाईव्ह :

         पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नागरी म्हणून ओळखले जाते . मागील आर्थिक वर्षात शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी व वाहन नोंदणी झालेली आहे . त्या माध्यमतून शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत आहे. सध्या मार्च अखेरचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी वाहतूक विभागाकडून वाहनांवर कारवाई केली जात आहे. परंतु अनेक नागरिकांना पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालयाकडूनच वाहन परवाना मिळालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

परंतु वाहतूक पोलीस  आरटीओच्या या चुकीचा विचार न करता सर्रासपणे नागरिकांना त्रास देत आहेत. मात्र पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील ३ महिन्यांपासून २० हजार ३९५ पक्के परवाने प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. परंतु पक्का परवाना सोबत नसल्याने  याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. पक्का परवाना सोबत नसल्याने वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. त्यामुळे अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी  नागरिकांना वाहन परवाने छापून देण्यास दिरंगाई करणाऱ्या यूटीएल या एजन्सीवर कारवाई करण्याचे मागणी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांच्याकडे केली आहे.

       आरटीओ नियमानुसार चाचणी व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर वाहन परवाना मान्य केला जातो . यानंतर तो संबंधित छपाई करणाऱ्या एजन्सीला पाठवला जातो . त्याची दोन दिवसाची मर्यादा असते . आणि त्यानंतर आठवड्याभरात तो वाहनधारकांना मिळणे अपेक्षित असते . परंतु ३ महिन्यांपासून वाहनधारकांना परवाने मिळत नसल्याची बातमी समोर आली आहे.  प्रादेशिक परिवहन कार्यालयात याबाबत विचारणा केली असता परवाने प्रिंटिंग झाले नसल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे .त्यामुळे या एजन्सीवर आरटीओचे नियंत्रण आहे कि नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ? 

त्यामुळे आरटीओच्या व प्रिंटिंग एजन्सीच्या चुकीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होता काम नये याची काळजी घेण्यात यावी. तसेच वाहन परवाने छापून देण्यास दिरंगाई करणाऱ्या यूटीएल या एजन्सीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अपना वतन संघटनेकडून करण्यात येत आहे. संबंधित एजन्सीवर कारवाई करून त्याबाबत अपना वतन संघटनेला ८ दिवसांमध्ये लेखी कळविण्यात यावे . अन्यथा उपप्रादेशिक कार्यालयावर तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हंटले आहे.यावेळी महीलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , संघटक प्रकाश पठारे , अतिक अत्तार, हाजीमलंग शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post