टिप्पर चालकांचा पुन्हा एल्गार , किमान वेतन द्या, अन्यथा संप

 


प्रेस मीडिया लाईव्ह  :

कोल्हापूर : शहरातील कचरा उठावाचे काम करणाऱ्या टिप्परचालकांना ठेकेदाराकडून किमान वेतन मिळणे बंधनकारक आहे. यासाठी महानगरपालिकेने मुख्य मालक (प्रिन्सिपल एम्प्लॉयर) म्हणून किमान वेतन दिले जाते का नाही हे तपासून ठेकेदाराची बिले काढणे अपेक्षित असताना मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.


टिप्परचालकांना किमान वेतन मिळते का नाही याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उपायुक्त रविकांत अडसूळ यांना दिल्या होत्या. परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे वेतन देण्याचे लेखी निर्देश सहायक कामगार आयुक्तांनी प्रशासकांना दिले आहेत. किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर असून देखील, किमान वेतन देताच येणार नाही अशा रक्कमेच्या निविदा महापालिकेने काढली आहे. यावर विचारणा केल्यानंतर, असे करून आम्ही महापालिकेचे पैसे वाचवत आहोत अशी सारवासारवी करणारे उत्तर दिले जात आहे. 


टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे यासाठी 'आप'च्या वतीने गेले तीन महिन्यापासून प्रयत्न केले जात आहेत, पण प्रशासन या कामी अजूनही सुस्त आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीने येत्या गुरुवार व शुक्रवार रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी घंटानाद करून महापालिकेला इशारा देण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या गेट समोर ठिय्या मांडून अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवण्यात येणार असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

जुनी निविदा रद्द करून, नवीन निविदा काढावी आणि त्या निविदेमध्ये व करारपत्रामध्ये किमान वेतनाची रक्कम नमूद केली गेली पाहिजे. तसेच टिप्परचालकांना किमान वेतन मिळते का याची खात्री करूनच ठेकेदारांची बिले काढावीत अशी मागणी 'आप'ने केली आहे.

मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करून सोमवार पासून संपावर जाण्याचा इशारा टिप्परचालकानी दिला आहे. यावेळी उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, विजय हेगडे, उमेश वडर, रणजित पाटील, कुमार साठे, युवराज कवाळे, संजय राऊत, रणजित बुचडे, नितीन कवाळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post