त्रैभाषिक कवी संमेलनाने रसिकांची मने जिंकली

 त्रैभाषिक कवी संमेलनाने रसिकांची मने जिंकली


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी ता. १२ हिंदी, उर्दू आणि मराठी ( हम ) या तीन भाषांचे बहारदार कवी संमेलन इचलकरंजीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहामध्ये हे त्रैभाषिक कवी संमेलन झाले. मराठी ,हिंदी आणि उर्दू कवितांची मेजवानी यानिमित्ताने इचलकरंजीकरांना मिळाली. प्रास्ताविकामध्ये महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी इचलकरंजीच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घडवून आणणे गरजेचे असल्याचे नमूद केले.प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ हिंदी कवी राजेश रेड्डी (मुंबई )हे या कवी संमेलनाचे अध्यक्ष होते .तर प्रसिद्ध कवी व अभिनेते किशोर कदम (मुंबई )ज्येष्ठ उर्दू गझलकार शबिना अदिब (कानपूर )ज्येष्ठ हास्य कवी मनोज मद्रासी (अमरावती )ज्येष्ठ उर्दू कवी सलीम चव्हाण( यवतमाळ), ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी, अभिनेत्री व कवियित्री गौरी पाटील आणि ज्येष्ठ उर्दू कवी व नामवंत निवेदक इरफान शाहनुरी (इचलकरंजी ) यांनी या कवी संमेलनात आपल्या बहारदार कविता व गझला सादर केल्या.

  जेष्ठ अभिनेते व कवी किशोर कदम ( सौमित्र) यांनी अत्यंत बहारदार आवाजामध्ये आपल्या अनेक कवितांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले.

 

एकमेकांची तहान पाहत कसं जगायचं असतं

 हे एकदा तरी सांग गालिब!

 आता मला तुझ्या वेदनांवर 

माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवून दे रेमाझं बोट धरून 

घेऊन चल मला कवितेच्या जंगलात

 पडणारा पाऊस पहायला ,

असे म्हणत तांत्रिक माध्यमांमुळे बोथट होत चाललेल्या  प्रेम भावनेवर भाष्य केले. 


 कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध हिंदी कवी राजेश रेड्डी यांनी हिंदी मधल्या अनेक कवितांचे उत्तमरीत्या सादरीकरण केले.तसेच कविता कशी जन्माला येते याचे त्यांनी विस्तृत वर्णन केले.

 

 जैसे गलत पते पे चला आए कोई शक्स

 सुख ऐसे मेरे दार पर आखे रुक गया। 

 

असे म्हणतानाच


 श्याम को जिस वक्त खाली हात घर जाता हू मै

 मुस्कुरा देते है बच्चे और मर जाता हूँ मै।

 

अशा अनेक हृदयस्पर्शी ओळी प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या.


कानपूरच्या लोकप्रिय उर्दू गझलकार कवयित्री शबीना अदिब  यांनी आपल्या दमदार आणि गोड आवाजात नाट्यगृह उर्दूमय करून टाकले.अनेक वेळा प्रेक्षकांच्या वन्स मोर मिळवणाऱ्या त्यांच्या कविता श्रोत्यांच्या मनात घर करून राहिल्या.


 कभी तो उतरेगा चांद छत पर

 कभी तो चमकेगी मेरी किस्मत

 कभी तो जागेगी याद बनकर 

तुम्हारे दिल मे मेरी मोहब्बत ..

इसलिए हथेलीयोंपर मैं मेहंदी लगा रही हुं...


या ओळीतून प्रेमाचा आशावाद जागवला.


डिग्रज यवतमाळ चे सलीम चौहान यांनीही आपल्या शायरीने प्रेक्षकांना मंत्र मुग्ध करून सोडले. ते म्हणाले,


ये खंडहर होके भी आबाद रखी जाती है

दिल हवेली मे तेरी याद रखी जाती है...

 हमसे दिवानोंको ही याद किया जाता है 

 जब कभी इश्क की बुनियाद रखी जाती है..

 मश्वरा पहले गुलाबो से लिया जाता है

 फिर तेरे सामने फरीयाद रखी जाती है...

त्यांचा सादरीकरणाचा अंदाज व शैली अनोखीच होती.


हास्य कवी मनोज मद्रासी यांनी हास्य हे जीवनात किती महत्त्वाचे आहे आणि रोजच्या दैनंदिन घटनांमध्ये हास्य कसं शोधता यायला पाहिजे याची अनेक उदाहरणे दिली.


भाषण के बाद कुछ कार्यकर्ता

 मंत्रीजी के पास आये 

बोले,सर,अपने दारूबंदी पर अच्छा भाषण दिया,

जनता का दिल जीत लिया

 मंत्रीजी हंस कर पीए से बोले 

देखा मै जनता की नस पकड लेता हूँ सच बात तो ये है कि

 पीकर भी अच्छा बोल लेता हूँ।

 

 या कवितेने तर सभागृहात प्रचंड हशा पिकला.

इचलकरंजीत लोकप्रिय कवी गझलकार आणि विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांनी विविध रसांच्या गझल सादर केल्या.

उध्वस्त होत नसते येऊनही सुनामी

 पण काळीज भोगते परिणाम दूरगामी..

  असे म्हणत

 वारापेक्षा वारीने समतेचा जागर होतो

  मी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत होतो..

  

अशा परिवर्तनशील गझलांचे प्रभावी सादरीकरण केले. स्थानिक कवयित्री सौ गौरी कुलकर्णी यांनी अत्यंत सुरेल आवाजामध्ये स्वरचित काव्याचे गायन केले.कुटुंब आणि नातेसंबंध बद्दल बोलताना त्या म्हणाल्या,


 प्रेम करावं प्रत्येकानं असं आपल्या घरावर 

जेवढं करतो स्वतःवर त्याच्यापेक्षा जरा वर 

असावे इकडचे रिश्ते जसे पौष्टिक बदाम पिस्ते 

एकमेकांना ही आपली एक दुजे के वास्ते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन इचलकरंजीतील आंतरराष्ट्रीय उर्दू गझलकार व निवेदक इरफान शहानुरी पटेल यांनी केले. त्यांच्या बहारदार निवेदनामुळे त्रैभाषिक कवी संमेलनाला एक वेगळा उच्च दर्जाचा आयाम प्राप्त झाला.त्यांनी आपल्या कवितांमधून भारतीय सलोखा राखण्याची ही आवाहन केले. ते म्हणाले,


हम वहां जाएंगे गर साथ सुदामा होगा

हम को मालूम है गोकुल में कन्हैया होगा,

केसरी तू है हरा मैं हु सफेदी उसकी

तीनो मिल जाएं तो हर घर में तिरंगा होगा..


या कवी संमेलनाच्या आयोजनात दैनिक महासत्ता ,श्री दगडूलाल मर्दा चारिटेबल ट्रस्ट ,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह, मनोरंजन मंडळ, क्रीडाही, उर्दू साहित्य अकॅडमी अँड चॅरिटेबल ट्रस्ट, टोमॅटो एफ.एम. फॉर्च्यून ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कवी संमेलनाला इचलकरंजी परिसरातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post