कुडचे मळा परिसरातील महिलांचा पाण्यासाठी महापालिकेवर मोर्चा



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी : 

येथील कुडचे मळा यासह विविध परिसरात मुबलक व नियमित पाणी पुरवठा करावा ,या मागणीसाठी महिलांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै.अमृत भोसले व माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त केतन गुजर यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सदर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईची समस्या सांगून ती तात्काळ मार्गी लावावी ,अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

येथील कुडचे मळा , हेरलगे मळा ,बाळ नगर ,तांबे माळ ,गुरुकन्नन नगर ,संत मळा , श्रीपाद नगर ,आवाडे मळा ,बरगे मळा या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना नियमित पुरेसे पाणी मिळत नसल्याने तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.याबाबत वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.त्यात सदर परिसरातील बहुतांश सार्वजनिक कुपनलिका बंद स्थितीत असल्याने पाणी उपलब्ध होण्यासाठी पर्यायच उरला नसल्याने महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून अजून किती दिवस पाणी टंचाईला सामोरे जायचे ,असा सवालही उपस्थित केला जात आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते पै.अमृत भोसले व माजी नगरसेवक मोहन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सदर परिसरातील नागरिकांनी  महापालिकेवर मोर्चा काढला.यामध्ये महिलांचा लक्षणीय समावेश होता.यावेळी पै.अमृत भोसले व माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी मोर्चेकऱ्यांच्या वतीने महापालिकेचे सहाय्यक उपायुक्त केतन गुजर यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सदर परिसरात कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना नियमित व मुबलक पाणी पुरवठा करावा ,अशी मागणी केली.

यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुभाष देशपांडे , बाजीराव कांबळे यांच्याशी देखील त्यांनी या संदर्भात सविस्तर चर्चा केली.तसेच काही महिलांनी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने आम्हाला पाणीच मिळत नसल्याने पाणी टंचाईची झळ बसून मोठे हाल होत असल्याचा संताप व्यक्त केला.

यावेळी झालेल्या चर्चेअंती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करुन पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करुन कोणालाही पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही , यासाठी प्रयत्नशील राहू ,असे शिष्टमंडळाला आश्वासन दिले.त्यामुळे मोर्चातील संतप्त महिला काही प्रमाणात शांत झाल्या.परंतू ,सदर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा , अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले.

Post a Comment

Previous Post Next Post