कोल्हापूर क्राईम : घरफाळा घोटाळाप्रकरणी संजय भोसले यांना अटक.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर :घरफाळा घोटाळा करून 46 लाख 23 हजारांचे नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन कर संग्राहक व निर्धारक संजय भोसले यांना दोषी ठरवून लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. 

घरफाळा घोटाळाप्रकरणी 13 जून 2020 रोजी संजय भोसले यांनीच दिलेल्या फिर्यादीवरून तीन कोटी 14 लाखांच्या घरफाळा नुकसानी प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पण आता फिर्यादीच संशयित म्हणून समोर आले आहेत. गुरुवारी (दि. 23) भोसले यांना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाकडून सहा ते आठ मिळकतधारकांना सवलत देऊन महापालिकेचे 3 कोटी 14 लाखांचे नुकसान केल्याचा आरोप ठेवून तत्कालीन कर संग्राहक दिवाकर कारंडे, विजय खातू, नितीन नंदवाळकर आणि अनिरुद्ध शेटे यांच्या विरोधात 13 जून 2020 रोजी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, अनिरुद्ध शेटे यांचा मृत्यू झाला आहे.

तत्कालीन करनिर्धाकर दिवाकर कारंडे यांच्या 2014 ते 2020 कार्यकालामध्ये 3 कोटी 14 लाख 61 हजार रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा गुन्हा दाखल होता. पोलिस तपासात 1 कोटी 80 लाख 7 हजार 339 नुकसान झाल्याचे निश्चित करण्यात आले. तर त्यापूर्वी याच पदावर कार्यरत असणारे संजय भोसले यांच्या 2011 ते 2013 कालावधीतही 46 लाख 23 हजारांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल पुढे आल्याचे पोलिसांनी न्यायालयात मांडले.

14 दिवस न्यायालयीन कोठडी

संजय भोसले यांना अटक झाल्यानंतर गुरुवारी दुपारी जिल्हा न्यायालयात दिवाणी न्यायाधीश एम. एम. पळसापुरे यांच्यासमोर त्यांना हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. एस. ए. म्हामुलकर यांनी संजय भोसलेंविरोधातील विभागीय चौकशी अहवाल दोषयुक्त असल्याने 14 लाख 23 हजारांच्या नुकसान भरपाईला ते जबाबदार असल्याचा युक्तिवाद करून पोलिस कोठडीची मागणी केली होती. तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रकाश मोरे यांनी कथित घोटाळा हा संजय भोसले करनिर्धारक असताना त्यांच्या कनिष्ठ लिपिकाने सादर केलेल्या तक्त्यानुसार कर आकारणी झाली होती. या चुका म्हणजे सेवेतील दोष असून त्यांची खातेअंतर्गत चौकशी होऊ शकते. मात्र गुन्हा दाखल होऊ शकत नाही. तसेच भोसले यांना वैद्यकीय कारणास्तव पोलिस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद केला. न्यायाधीश पळसापुरे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून संशयित संजय भोसले यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Post a Comment

Previous Post Next Post