पीएम किसान योजनेत लाभार्थ्यांना दाखवले मृत

 पीएम किसान योजनेतील घोटाळा आला उघडकीस 


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरढोण (ता. शिरोळ) येथे पीएम किसान योजनेत लाभार्थ्यांना मृत दाखवून अपात्र केल्याच्या निषेधार्थ हे घ्या पुरावा म्हणत पीएम किसान योजनेतील घोटाळा उघडकीस आणला. मृत दाखवलेल्या लाभार्थ्यांनी गावचावडी समोर बसून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. स्वाभिमानी संघटनेचे विश्वास बालीघाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

मंडल अधिकारी दिलीप गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले. मंडल अधिकारी गायकवाड, तलाठी रवी कांबळे, कृषी सहायक शशिकांत कांबळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांनी अर्ज दिल्यास दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पीएम किसान योजनेत येथील शेकडो शेतकरी अपात्र दाखविल्याने लाभापासून वंचित राहिले आहेत. शिवाय पाचहून अधिक शेतकरी जिवंत असतानाही मृत दाखविल्याने योजनेत दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थी गावातील तलाठी, कृषी सहायक यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, तलाठी आणि कृषी सहायक दोघांनाही जबाबदारी झटकत असल्याने स्वाभिमानीचे बालीघाटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी गावचावडीच्या दारातच लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

योजनेत मृत दाखविण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी गावचावडीच्या दारातच बसून जिवंत असल्याचा हा घ्या पुरावा म्हणत, लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले. या अभिनव आंदोलनाची जिल्ह्यात चर्चा रंगली होती. यावेळी सरपंच बाबूराव हेरवाडे, माजी सरपंच बाबूराव कोईक, कल्लाप्पा चौगुले, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रमोद कांबळे, गजानन सासणे आदी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post